“प्रचार एवढा का शांत आहे. प्रचाराची काहीच गडबड दिसत नाही,” मी विचारले. त्यावर पर्यटकांना दररोज मदुरैचे शहरदर्शन घडविणारा तो चालक उत्तरला, “कशाला करतील प्रचार? ते थेट पैसे वाटून निवडून येणारेत.”
अन् त्या चालकाने दिलेल्या प्रतिक्रियेचा प्रत्यय पावला-पावलावर येत होता. पैसे वाटल्याच्या, रकमा पकडल्याच्या आणि निवडणूक आयोगाने कडक कारवाई केल्याच्या बातम्या येतच होत्या. परंतु, चेन्नईला पाऊल ठेवल्यापासून प्रचाराची काही म्हणता काही लक्षण दिसत नव्हते. पुदुच्चेरी, मदुरै, रामेश्वरम, तिरुचिरापल्ली इ. भागांमध्ये हेच चित्र बहुतांशी दिसत होते. भारतीय जनता पक्षाचे काही चुकार टेम्पो वगळले, तर राज्यात कुठेही निवडणूक चालू असल्याची चिन्हे दिसत नव्हती. शेजारच्या पाँडिचेरीतही तशीच शांतता. वाढलेल्या संसाधनांमुळे असेल कदाचित, भाजप मात्र सगळीकडे दिसतो. भित्तीपत्रक, बॅनर्स आणि भोंगे – अन् शिवाय सोशल मीडिया – यावर भाजपची उपस्थिती सर्वाधिक लक्षणीय आहे. त्यामुळे भाजपला कधी नाही ते २ ते ५ जागा मिळाल्या तरी आश्चर्य वाटायला नको. एरवी बाकी सगळे पक्ष कुठे आहेत आणि कुठे नाही, अशी परिस्थिती.
प्रचाराच्या या अभावामुळेच तमिळनाडूचा निकाल काय लागेल, हे सांगणे अशक्य बनले आहे. चो रामास्वामी यांच्यासारख्या जाणत्या तज्ज्ञानेही अलीकडे लिहिले आहे, “या निवडणुकांचे निकाल असेही लागू शकतात आणि तसेही. काहीही ठाम मत बनविणे अशक्य आहे. अम्मांनी दिलेल्या मोफत वस्तूंच्या आश्वासनामुळे काय फरक पडेल तोच काय तो.” थोडक्यात म्हणजे तमिळनाडुच्या निवडणुकीचा हत्ती कोणत्या बाजूने कलंडणार, हे कोणीही सांगू शकत नाही.
राजकारणाचे ठाशीव रंग दाखविणाऱ्या तमिळनाडूतील ही सामसूम फार काही चांगले लक्षण म्हणता येणार नाही. केंद्र सरकारच्या अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेप्रमाणे इथे थेट पैसे वाटून मते घेण्याचा प्रकार चालू झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पैसे वाटप पकडण्यासाठी तब्बल दोन हजारांहून अधिक पथके स्थापन केली होती. यावरूव त्याच्या प्रमाणाचा अंदाज यावा. अशी पावले उचलल्यामुळेच ट्रकच्या ट्रक पैसे जप्त करणे शक्य झाले. पण दाक्षिणात्य राजकारणात जे होते तेच नंतर देशाच्या राजकारणात घडते. म्हणून ही प्रथा सगळीकडे चालू होणार, यात शंका नाही.
सुरूवातीला वाटले होते, की जयललिता यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असल्यामुळे वातावरण फारसे तापलेले नसावे. परंतु, हळूहळू परिस्थिती बदलत गेली. टास्माक ही तमिळनाडू सरकारची दारू उत्पादक कंपनी. राज्यात तिचा दारूविक्रीचा एकाधिकार आहे. या टास्माकची दुकाने उघडण्याच्या मुद्द्यावरून द्रविड मुन्नेत्र कळगम आणि त्याच्या जोडीने काँग्रेसने अम्मांना घेरले. राज्यातील जवळपास सर्वच पक्षांनी संपूर्ण दारूबंदीचे आश्वासन दिले आहे. परंतु ते पाळले जाणार नाही, याबाबत सगळेच आश्वस्त आहेत.
मदुरैत एकाला बोलताना तो म्हणाला, “अम्मा आल्यापासून सगळ्या गोष्टींचे भाव वाढले आहेत. प्रत्येक ठिकाणी पैसे द्यावे लागतात. साधे विजेची जोडणी घ्यायची असेल तर पंचवीस हजार रुपये द्यावे लागतात.” पण करुणानिधींचे वय पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद झेपणार आहे का, ही शंकाच आहे. अनेकांनी अनेकदा सांगूनही त्यांनी मुलगा स्टॅलिन याला या पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. उलट मी सहाव्यांदा मुख्यमंत्री व्हावे, ही त्याचीच इच्छा असल्याचे एका सभेत त्यांनी सांगितले.
या दोन पारंपरिक पक्षांच्या समोर मक्कळ नल कुट्टणी (लोककल्याण आघाडी) नावाचे एक गाठोडे उभे आहे. त्यात विक्षिप्तपणाबद्दल प्रसिद्ध असलेले विजयकांत, करुणानिधींपासून दुरावलेले वैको, कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या पक्षांचा भरणा आहे. ही आघाडी द्रमुकची मते खाईल, अशी जयाम्मांना आशा आहे. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी आपल्याकडे काँग्रेसने ज्या प्रकारे मनसेला लक्ष्य करून मोठे केले, त्या प्रमाणे ‘जया टीव्ही’वरून सातत्याने विजयकांत यांच्या विक्षिप्तपणाच्या दृश्यफीती दाखविल्या जातात. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
म्हणूनच मतदानपूर्व एकजात सगळ्या पाहण्या इरट्टै इलै (जयललितांच्या अण्णा अद्रमुकची निशाणी) विजयी होणार असे सांगत होत्या, त्यावेळी लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुजबूज सुरू झाली होती. चेन्नईतील पुराच्या वेळेस केंद्र सरकारने दिलेला भरघोस पैसा अम्मांनी दाबून ठेवला आणि आता निवडणुकीत तो त्या लोकांना वाटणार आहेत, असे चेन्नईला जाताना रेल्वेतील सहप्रवाशी सांगत होते. भाववाढ झाली म्हणून मदुरैत लोक ओरडत होते आणि संपूर्ण राज्यभर अम्मा आम्हाला भेटत नाहीत, अशी तक्रार लोक करत होते. हा तर मुद्दा विरोधकांनी एवढा उचलला, की राजकारणात लिंबूटिंबू असलेल्या राहुल गांधींनीही त्याचा फायदा उचलला.
चेन्नईतील सभेत राहुलच्या इंग्रजी भाषणाचा तत्काळ तमिळ अनुवाद द्रमुकचे नेते करत होते. तितक्यात त्यांचा माईक खराब झाला. तेव्हा राहुलनी आपला माईक त्यांच्यापुढे धरला आणि लोकांना म्हणाले, “तुमच्या मुख्यमंत्री तर तुम्हाला समोरही उभे करत नाहीत. मी मात्र माझा स्वतःचा माईक यांना दिला.”
थोडक्यात जयाम्मांसाठी ही निवडणूक लाल गालिचा नाही. परंतु, त्यांच्या विरोधकांमध्येही एकजूट आणि स्पष्टता नाही. त्यामुळे जो जिंकेल, त्याने मतदानाच्या दिवशी जास्त पैसे वाटले, एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Story img Loader