वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे स्मृतिभ्रंशाचा (अल्झायमर) धोका कमी होतो, असे एका नवीन संशोधनात दिसून आले आहे. १९६०पासून बिटा ब्लॉकर औषधे ही रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जात आहेत. त्यांच्या वापरामुळे मेंदूत स्मृतिभ्रंशाला कारणीभूत होणारे बदल घडण्यास अटकाव होतो व स्मृतीशी संबंधित इतर विकार बळावण्यास त्यामुळे प्रतिबंध होतो.
उच्च रक्तदाबामुळे मध्यवयात रुग्णांना स्मृतिभ्रंशाचा धोका असतो. त्याचबरोबर हृदयरोग व रक्ताभिसरणातील अनियमितता दिसून येते असे डेली मेलने संशोधनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
संशोधकांनी जपान व अमेरिकेच्या ७७४ वयोवृद्ध व्यक्तींच्या मेंदूचा त्यांच्या मृत्यूनंतर अभ्यास केला. होनोलूलू-आशिया वार्धक्य अभ्यास उपक्रमात हे संशोधन करण्यात आले असून, त्यात उच्च रक्तदाब असलेल्या ६१० व्यक्तींना उच्च रक्तदाब होता किंवा त्यांच्यावर त्यासाठी उपचार करण्यात आले होते. उपचार करण्यात आलेल्या ३५०पैकी १५ टक्के व्यक्तींना केवळ बिटा ब्लॉकर, १८ टक्के व्यक्तींना बिटा ब्लॉकर व उच्च रक्तदाबावरची इतर औषधे देण्यात आली होती. इतरांना रक्तदाबावरची साधारण औषधे देण्यात आली होती.
उच्च रक्तदाबाच्या उपचारांमुळे मेंदूचे संरक्षण झाले, असे अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या सँदियागो येथील बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्राथमिक माहितीत दिसून आले आहे. ज्यांच्यावर उच्च रक्तदाबासाठी उपचार केले नव्हते किंवा ज्यांना रक्तदाबावरची साधी औषधे दिली गेली होती, त्यांच्या तुलनेत बिटा ब्लॉकर औषधे दिलेल्या रुग्णांमध्ये मेंदूत विकृती निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. ज्यांना रक्तदाबविरोधी इतर औषधांबरोबरच बिटा ब्लॉकर दिली गेली होती त्यांना हा फायदा झाल्याचे दिसून आले असून, त्यांच्यात पक्षाघाताचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले.  होनोलुलूच्या पॅसिफिक हेल्थ रीसर्च अँड एज्युकेशन इन्स्टिटय़ूटचे डॉ. लॉन व्हाइट यांच्या मते बिटा ब्लॉकर्स ही रक्तदाबावर नेहमी वापरली जाणारी औषधे असून, त्यामुळे मेंदूचे आरोग्य राखले जाते. स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी उच्च रक्तदाब टाळणे गरजेचे असते, असे डॉ. सिमॉन रिडले यांनी सांगितले.

Story img Loader