२३ जून २०१९ चा दिवस होता. दिल्लीतल्या वसंत विहार भागात बबली नावाची एक गृहसेविका वसंत विहारमध्ये पोहचली. वसंत विहार दिल्लीतला उच्चभ्रू भाग आहे. या भागात बबली एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी काम करत होती.

२३ जून २०१९ ला काय घडलं होतं?

विष्णू माथुर (वय-८०), शशी माथुर (वय ७५) हे दोघंही दिल्लीच्या महापालिकेतून निवृत्त होऊन या ठिकाणी राहात होते. या ठिकाणी म्हणजेच पहिल्या मजल्यावरच्या दोन बेडरुम असलेल्या फ्लॅटमध्ये आणखी एक व्यक्ती राहात होती तिचं नाव होतं खुशबू नौतियाल. शशी माथुर आजारी असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी खुशबूची नेमणूक करण्यात आली होती. बबलीने २३ जूनला घराच्या दरवाजाची बेल वाजवली. पण काहीही प्रतिसाद आला नाही. तिने पुन्हा बेल वाजवली आणि वाट पाहिली. कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर बबलीने तिच्याकडे असलेल्या फ्लॅटच्या चाव्या घेतल्या आणि दार उघडणार तोच तिला कळलं की घराचं दार उघडंच आहे. बबली मग घरात गेली तेव्हा तिने पाहिलं की शशी आणि विष्णु माथुर यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर दुसऱ्या खोलीत खुशबूचाही मृतदेह पडला होता. या तिघांचेही गळे चिरण्यात आले होते. तसंच या तिघांनाही भोसकण्यात आलं होतं. हे सगळं पाहून तिला धक्काच बसला.

पोलिसांना बोलवण्यात आलं आणि…

तातडीने पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी कुणीही जोरजबरदस्तीने आल्याच्या खुणा दिसल्या नाहीत. चहाचे कपही तसेच होते. तसंच दरवाजाही तोडण्यात आल्याच्या काही खुणा नव्हत्या. सोन्याचे दागिने काही प्रमाणात गायब होते. तसंच माथुर दाम्पत्याचे मोबाइल फोन पळवण्यात आले होते. बाकी संपूर्ण घरात लुटण्यासारख्या अनेक वस्तू होत्या ज्या जैसे थे अवस्थेत होत्या. पोलिसांनी मग आणखी कसून तपास केला तेव्हा पोलिसांना एक गोष्ट सापडली. खुशबूच्या खोलीत कंडोमचं एक पाकिट होतं. आता आपल्याला संशयित मिळू शकेल का? असा विचार पोलीस करु लागले.

खुशबूच्या बॉयफ्रेंडवर पहिला संशय

खुशबू माथुर कुटुंबासह जवळपास वर्षभरापासून राहात होती. माथुर दाम्पत्याचा मुलगा काही वर्षांपूर्वी अपघातात गेला. शशी माथुर आजारी होत्या. त्यांची सेवा करण्यासाठी खुशबूला आणण्यात आलं होतं. तसंच त्यांची मुलगी दक्षिण दिल्ली भागात राहात होती. त्यामुळे हे दाम्पत्य पूर्णपणे खुशबूवर अवलंबून होतं. पोलिसांनी या हत्येनंतर शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की खुशबूचा बॉयफ्रेंड तिला भेटण्यासाठी माथुर दाम्पत्याच्या या फ्लॅटमध्ये कायम येत होता. खुशबूच्या खोलीत पोलिसांना कंडोमचं पाकिट मिळालं होतं त्यावरुन जी शंका पोलिसांना आली होती ती खरी ठरली. खुशबूचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती त्यांना मिळाली. आता पोलिसांनी हा प्राथमिक अंदाज काढला की खुशबूचा बॉयफ्रेंड तिला भेटायला आला आणि त्यानेच या तिन्ही हत्या केल्या. पळून जात असताना त्याच्या खिशातलं कंडोमचं पाकिट खाली पडलं असावं. ज्यानंतर पोलिसांनी खुशबूच्या त्या बॉयफ्रेंडला इतर काही संशयितांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की आम्ही त्या सगळ्यांची सुमारे ७२ तास कसून चौकशी केली. पण संशयास्पद असं काही आढळून आलं नाही. पोलीस म्हणाले आमचा मुख्य संशयित आणि घडलेली तिहेरी हत्याकांडाची घटना याचा काही संबंध नव्हता. त्यानंतर आम्ही तपासाची दिशा बदलली.

प्रीती शेरावतचं कनेक्शन समोर आलं आणि…

पोलिसांनी मग माथुर दाम्पत्याच्या मुलीकडे पुन्हा एकदा चौकशी केली की तुझ्या आई वडिलांची हत्या होण्यापूर्वी तुला असं काही वाटलं का की जे नॉर्मल नाही, अशा कुठल्या घटनेबाबत आई वडील काही म्हणाले होते का? त्यावेळी माथुर दाम्पत्याच्या मुलीला आठवलं की प्रीती शेरावत नावाची एक महिला माथुर दाम्पत्याला भेटण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेकदा आली होती. प्रीतीची आई आणि शशी माथुर या दोघीही दिल्ली महापालिकेत बरोबर काम करत होत्या. निवृत्तीनंतरही एकमेकींच्या संपर्कात नव्हत्या. पण प्रीतीने माझ्या आई वडिलांना शोधलं आणि त्यांच्याशी संपर्क वाढवला होता. तो नेमका का वाढवला होता हा प्रश्न मला पडला होता असं माथुर दाम्पत्याच्या मुलीने पोलिसांना सांगितलं. प्रीती शेरावत आता कुठे असेल? याचा शोध पोलीस घेऊ लागले. पोलीस प्रीतीचा शोध घेत होते. गुडगावच्या एका हॉटेल रुममध्ये प्रीती सापडली.

२६ जूनला विष्णू माथुर यांचा मोबाइल काही काळासाठी सुरु झाला होता

माथुर दाम्पत्याच्या हत्येनंतर त्या दोघांचे मोबाइल गायब होते. त्यातील विष्णू माथुर यांचा फोन २६ जून २०१९ ला म्हणजे हत्येनंतर चार दिवसांनी ऑन झाला. याचं लोकेशन पोलिसांना मिळालं आणि फोन ऑन होणं हा पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरला. गुडगावच्या हॉटेल रुममध्ये हा मोबाइल ऑन झाला होता. पोलीस तिथे पोहचले तेव्हा त्यांना कळलं की प्रीती त्या रुममध्ये तिचा लिव्ह इन पार्टनर मनोज भट्टसह राहते. मनोजने विष्णू माथुर यांचा फोन चुकून ऑन केला होता. पण त्यामुळे पोलिसांना प्रीतीचं लोकेशन कळलं. या दोघांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला.

सुशांत लोक या भागात पोलिसांना काय मिळालं?

पोलीस त्यानंतर सुशांत लोक, DLF फेज वन या ठिकाणी गेले. तिथे जो काही कचरा आणि ढिगारा पडला होता त्यात पोलिसांना एक सुरा आणि एक स्क्रू ड्रायव्हर सापडला. त्याचवेळी त्यांची नजर आणखी एका गोष्टीवर गेली कंडोमच्या दोन स्ट्रीप. पोलिसांना जे एक पाकीट मिळालं होतं ते जुळवून पाहिलं असता तो कंडोमही या दोन स्ट्रीपचा तिसरा भाग आहे हे पोलिसांना कळलं. पोलिसांनी ते पाकिट फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवलं. फॉरेन्सिकने माथुर कुटुंबाच्या घरी सापडलेला कंडोम आणि गुडगावमध्ये सापडलेली दोन कंडोमची स्ट्रीप या तिन्ही गोष्टी सारख्याच आहेत असा निष्कर्ष दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुशबूच्या बॉयफ्रेंडवर संशय घेतला जावा म्हणूनच तो कंडोम तिथे टाकण्यात आला होता.

प्रीती आणि तिचा पार्टनर मनोज यांनी केली हत्या

प्रीती शेरावतचं लग्न निकोलस नावाच्या एका माणसाशी झालं होतं. मात्र तो काही काम धंदा करत नव्हता. निकोलसपासून प्रीतीला दोन मुलं झाली. पण नंतर निकोलस तिला सोडून गेला. त्यानंतर २०१४ च्या आसपास हे दोघंही वेगळे झाले आणि प्रीतीच्या आयुष्यात मनोज भट्ट आला. मनोज भट्टची पार्श्वभूमी गु्न्हेगारी होती. पत्नीची हत्या केल्याच्या आरोपात मनोज भट्ट २०१० पर्यंत तुरुंगात होता. दरम्यान सुरुवातीला घर चालवण्यासाठी दोघंही काम करत होते. पण नंतर मनोजही दारु पिऊ लागला. पडेल ते काम करण्याची वेळ प्रीतीवर आली. त्यानंतर ती आजारी झाली होती तेव्हाही तिच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. दरम्यान दोघांचे खटके उडत असतानाच प्रीतीला माथुर कुटुंबाची आठवण आली. त्यानंतर या दोघांनी या दाम्पत्यासह खुशबूची हत्या केली. आर्थिक चणचण भासू लागल्यानेच प्रीतीने माथुर कुटुंबाकडे येणं जाणं वाढवलं होतं. मनोज आणि प्रीती या दोघांनीच माथुर दाम्पत्य आणि त्यांना सांभाळणाऱ्या खुशबूची हत्या केली. हत्येच्या दिवशी हे दोघं रात्री १०.३० च्या सुमारास माथुर यांच्याकडे गेले. तेव्हा इतक्या उशिरा कसे काय आलात? म्हणून या दोघांनाही विष्णू माथुर यांनी हटकलं. तेव्हा काही नाही आम्ही सहजच आलो आहोत असं सांगितलं. मनोज खुशबूला म्हणाला की चहा करुन देतेस का? खुशबूने चहा तयार करुन आणला तेव्हा सर्वात आधी तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर मनोज विष्णू आणि शशी माथुर यांच्या बेडरुममध्ये गेला आणि तिथे स्क्रू ड्रायव्हर आणि चाकूचे वार करत या दोघांना संपवलं. त्यांच्या प्रॉपर्टीचे कागदही पळवले आणि फोनही पळवले. जो कट प्रीत आणि मनोजने आखल होता त्यामुळे त्यांच्यावर संशय येणं दुरापास्त होतं. पण विष्णू माथुर यांच्या हत्येनंतर चार दिवसांनी मोबाइल ऑन झाला आणि हे दोघं पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी अत्यंत खुबीने या गुन्ह्याची उकल केली, यात शंकाच नाही. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.