बीएमडब्ल्यू कंपनीने भारतातील वाहनधारकांच्यादृष्टीने एक अत्यंत आनंदाची घोषणा केली आहे. या घोषणेनूसार आता बीएमडब्ल्यूच्या भारतातील स्थानिक प्रकल्पांमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या वाहनांच्या किंमतीत विशेष सूट दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या घोषणेला प्रतिसाद देत बीएमडब्ल्यूने यापूर्वीच चेन्नई येथील कारखान्यात वाहनांच्या भागाची निर्मिती करण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवले होते.
जागतिक पातळीवर भारतीय बाजारपेठेला उज्ज्वल भविष्य आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय बाजारपेठेत फायदा मिळवायचा असेल तर, आत्तापासूनच कामाला सुरूवात केली पाहिजे, असे बीएमडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष फिलिप व्हॉन यांनी सांगितले. ‘बाजारपेठ तेथे उत्पादन’ या आमच्या तत्त्वानूसार कंपनीने भारतात वाहननिर्मिती करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. भारतीय ग्राहकांना कमीतकमी किंमतीत चांगल्या दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बीएमडब्ल्यूने २००७मध्ये चेन्नई येथे वाहननिर्मिती प्रकल्प सुरू केला होता. त्यानंतर आजपर्यंत वाहन बनविण्याची अधिकाअधिक प्रक्रिया स्थानिक पातळीवर पार पडावी, यासाठी बीएडब्ल्यूकडून प्रयत्न करण्यात येत होते. सध्याच्या घडीला चेन्नईतील कारखान्यात बीएमडब्ल्यूच्या आठ मॉडेल्सचे उत्पादन करण्यात येते. यामध्ये ‘बीएमडब्ल्यू १ सिरीज’, ‘बीएमडब्ल्यू ३ सिरीज’, ‘बीएमडब्ल्यू ३ सिरीज ग्रॅन टुरिस्मो’, ‘बीएमडब्ल्यू ५ सिरीज’, ‘बीएमडब्ल्यू एक्स ३’ , ‘बीएमडब्ल्यू एक्स ५’, ‘बीएमडब्ल्यू ७ सिरीज’ या मॉडेल्सचा समावेश आहे.
याशिवाय, कारच्या निर्मितीसाठी बीएमडब्ल्यूकडून वाहनांचे सुटे भागही भारतीय कंपन्यांकडूनच खरेदी केले जातात. यामध्ये इंजिन आणि ट्रान्समिशन- फोर्स मोटार्स, अॅक्सेल्स- झेडएफ हिरो केसिस, दरवाजाचे पॅनल आणि वायरिंग हार्नेस- ड्रॅक्सलमायर इंडिया, एक्झॉस्ट सिस्टिम- टेनेको ऑटोमोटिव्ह इंडिया, सीटस- लीअर इंडिया आणि एअरकंडिशनिंगचे सुटे भाग व्हॅलो इंडिया आणि महाले बेहर या कंपन्यांकडून खरेदी केले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा