आसाम राज्यात मंगळवारी बोडो अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ४८ नागरिक ठार झाल्याचे समजत आहे. मंगळवारी संध्याकाळपासून बोडो अतिरेक्यांनी हत्येच्या या सत्राला सुरूवात केली. राज्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या हल्ल्यात ४८ जण ठार झाले असून, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. यापैकी सोनितपुरात ३३ जण आणि कोकोराझारामध्ये चार जणांची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून, सध्या संपूर्ण आसाममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांनी उत्तर आसाम, अरूणाचल प्रदेश आणि भुतानचा सीमावर्ती भागाला लक्ष्य केल्याचे समजते.
पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बोडो अतिरेक्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहीमेच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचे समजत आहे. या मोहीमेत स्थानिक आदिवासी लोकांनी पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरून या हत्या केल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांच्याशी आपण यासंदर्भात बोललो असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लवकरच या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, राजनाथ सिंह यांनीदेखील माओवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करत केंद्राकडून आसाममधील परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा