Karhal Dalit Woman Murder: महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रात एकीकडे मतदानादरम्यान गोंधळाची परिस्थिती दिसत आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांवर हल्ले करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना घडल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशच्या करहळ येथेही अशीच घटना घडली असून एका दलित तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह बॅगेत आढळून आला आहे. या घटनेमुळे मैनपूरी जिल्ह्यातील करहळ विधानसभेत खळबळ माजली आहे. मृत तरुणीच्या आईने या घटनेनंतर समाजवादी पक्षावर आरोप केला आहे. प्रशांत यादव नामक व्यक्तीने माझ्या मुलीचा राजकीय वैमनस्यातून खून केल्याचा आरोप केला आहे.
मृत तरुणीच्या आईने पुढे म्हटले की, माझ्या मुलीचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. माझ्या मुलीने भाजपाला मतदान करण्याचा निर्णय बोलून दाखविल्यामुळे प्रशांत नाराज होता. जर तिने समाजवादी पक्षाला मतदान केले नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी तिला देण्यात आली होती.
मृत तरूणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दोन प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काल (१९ नोव्हेंबर) दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी तरूणीला बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. त्यानंतर आज तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना मृतदेहाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपास सुरू केला. तसेच शवविच्छेदन करण्यासाठी तिचा मृतदेह पाठवून देण्यात आला.
ज्येष्ठ पोलीस अधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले की, करहळ येथून काल रात्री २३ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तिचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. तिच्या वडिलांनी दोन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाचे नाव प्रशांत यादव आणि दुसऱ्याचे नाव मोहन कथेरिया आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.