Assam: आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यात असलेल्या एका कोळसा खाणीत धक्कादायक घटना घडली आहे. या कोळसा खाणीत एका खाण कामगाराचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच अद्यापही ९ खाण कामगार खाणीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही कोळसा खाण २०० फूट खोल असून बेकायदा असल्याची माहिती समोर येत आहे. या कोळशाच्या खाणीत अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे हे खाण कामगार अडकले. ही घटना सोमवारी घडली. त्यानंतर लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर बचाव मोहिम सुरु करण्यात आली असता खाणीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
तसेच ९ खाण कामगार अजूनही खाणीत अडकलेले आहेत. सध्या लष्कर, आसाम रायफल्स, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य करण्यात येत आहे. दरम्यान, खाणीत पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच थेट २०० फूट खोलवर असलेल्या या खाणीतून पाणी बाहेर काढण्यासाठी पुरेशा उपकरणांचा अभाव असल्यामुळेही अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यातील ही कोळशाची खाण बेकायदेशीर असल्याचं सरकारने आता म्हटलं आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. पण बचावकार्यात पाण्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याने मंगळवारी सायंकाळी बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. बुधवारी पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देखील दखल घेतली असून या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात एनडीआरएफचे कमांडंट एन तिवारी यांनी सांगितलं की, कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. लवकरच आम्ही अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश येईल.