Bodybuilder Chitra Purushotham: कर्नाटकमधील महिला बॉडीबिल्डर चित्रा पुरुषोत्तम सध्या प्रकाशझोतात आहे. चित्रा पुरुषोत्तमचे नुकतेच लग्न झाले. लग्नानिमित्त चित्राने नवरीच्या वेषातही आपला छंद जोपासला आणि पिळदार शरीरयष्टीची झलक दाखवली. पिवळ्या कांजीवरम साडीत बॉडी पोज देतानाचा एक व्हिडीओ चित्रा पुरुषोत्तमने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तेव्हापासून या व्हिडीओला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. अनेक लोक आपापल्या पद्धतीने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये चित्राने पिवळ्या – निळ्या रंगाची कांजीवरम साडी नेसलेली आहे. तिच्या पिळदार दंडाना तेलमालीश करत असताना व्हिडीओची सुरूवात होते. इतर वधूप्रमाणेच चित्रानेही सोन्याचे दागिने, कमरबंध, टिकली, कानातले आणि बांगड्या घातल्या आहेत. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, चित्राने तिचा प्रियकर किरण राजबरोबर लग्न केले आहे.

या व्हिडीओत चित्रा वधूच्या रुपात नटलेली दिसत आहे. लग्नाची आठवण म्हणून ती व्हिडीओ आणि फोटोंसाठी पोज देताना दिसते. परंतु पारंपरिक वधूंप्रमाणे लाजत-मुरडत फोटो काढत असतानाही तिने मेहनतीने कमवलेली बॉडीची झलक दाखवताना दिसते.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील व्हिडीओ शेअर करताना चित्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, मानसिकता हेच सर्वस्व आहे. २३ फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर दिवसेंदिवस या व्हिडीओमुळे चित्राला प्रसिद्धी मिळत आहे.

तत्पूर्वी १७ फेब्रुवारी रोजीही चित्रा पुरुषोत्तमने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात प्री वेडिंग शुट करतानाच्या गमतीजमती रेकॉर्ड करण्यात आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करताना दिसून येत आहे. चित्रा आणि तिचे सहकारी हसत खेळत या क्षणाचा आनंद घेताना दिसतात.

चित्राच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होत आहे. काहींनी चित्राच्या आत्मविश्वासाला पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. तिचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे, तुला भविष्यासाठी शुभेच्छा… असे एका युजरने म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, आत्मविश्वास हाच खरा दागिना असून तिने अतिशय छान पद्धतीने तो मिरवला आहे.

चित्रा पुरुषोत्तम ही लोकप्रिय फिटनेस ट्रेनर आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती तिचे फिटनेसबाबतचे व्हिडीओ शेअर करत असते. आजवर तिने मिस इंडिया फिटनेस, व्हेलनेस, मिस साऊथ इंडिया आणि मिस कर्नाटक या सारख्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे.