विमान उद्योग कंपनी बोइंग यावर्षी फायनान्स आणि एचआर विभागातील २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी यापैकी एक तृतीयांश नोकऱ्या बंगळुरू येथील टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसद्वारे आऊटसोर्स करणार आहे. कंपनीचे वरिष्ठ संचालक माईक फ्रीडमॅन यांचा हवाला देत असं सांगण्यात आलं आहे की, बोइंग कंपनी फायनान्स आणि ह्युमन रिसोर्स विभागात मोठी कपात करणार आहे.
दरम्यान कंपनीने सोमावारी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, आम्ही अद्याप कोणालाही कामावरून काढल्याबद्दल सूचित केलेलं नाही. आम्ही सर्व माहिती पारदर्शकपणे सर्वांसमोर मांडू. बोइंगने त्यांचं मुख्यालय नुकतंच व्हर्जिनियामधल्या एर्लिंग्टन येथे हलवलं आहे.
बोइंग कंपनीने माहिती देताना म्हटलं आहे की, आम्ही गेल्या वर्षी १५,००० नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली होती. आमचं लक्ष अभियांत्रिकी आणि उत्पादनावर आहे. त्यामुळे आम्ही आणखी १०,००० कर्मचारी नियुक्त करण्याची योजना बनवत आहोत.
३१ डिसेंबर २०२२ मध्ये कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १,५६,००० इतकी होती. सिएटल टाईम्सच्या वृत्तानुसार वॉशिंग्टनमधील या मोठ्या खासगी कंपनीने एक तृतीयांश पदं बंगळुरूतील टीसीएस कंपनीद्वारे आउटसोर्स करण्याची योजना बनवली आहे.
हे ही वाचा >> Tech Layoffs: गुगल, फिलिप्सपाठोपाठ आणखी एका टेक कंपनीचा कामगारांना धक्का, ६६५० जणांची नोकरी जाणार
दिग्गज कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरूच
अलिकडच्या काळात गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. तसेट अमेझॉनने १८,०००. मेटा कंपनीने ११,०००, ट्विटरने ४,०००, मायक्रोसॉफ्टने १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. तसेच टेस्ला, नेटफ्लिक्स, फिलिप्स, आणि डेल टेक्नोलॉजीसारख्या कंपन्या देखील या यादीत आहेत.