राजकीय चर्चेतून अनेकदा सामान्य नागरिकांमध्ये वाद निर्माण होतात. या वादाचं पर्यवसन हाणामारीत होतं. अनेकदा तिसऱ्या व्यक्तीला या दोघांच्या भांडणात पडावं लागतं. मात्र, मिर्झापूरमध्ये राजकीय चर्चेदरम्यान हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी बोलेरो गाडीचा चालक असून तो घटनास्थळाहून पसार झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलाही गावातील राकेशधर दुबे यांचा मुलगा प्रमोद कुमार दुबे याचं प्रतापगढच्या राणीगंज येथील सोनिया पांडेय हिच्याशी ११ जून रोजी लग्न झालं. रविवारी लग्नाची वरात मिर्झापूरच्या राम जानकी पॅलेस रीवा रोडवर आली. लग्नाचे सर्व विधी संपल्यानंतर सोमवारी सकाळी सर्व वऱ्हाड मंडळी आपआपल्या घरी जाण्यास निघाले.

वराचे काका राजेशधर दुबे (५०) आणि कठवइया येथे राहणारे लालजी मिश्रा, महोखर येथे राहणारे धीरेंद्र कुमार पांडेय यांच्यासह अनेक जण बोलेरो गाडीत बसून घरी जात होते. प्रवास सुरू असतानाच गाडीमध्ये राजकीय चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या कामांची प्रशंसा करण्यात आली. परंतु, या गाडीचा चालक विजयपूर छानबे याला राग आला. त्याने मोदी आणि योगींविरोधात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे या दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. गैपुरा चौहारा येथे एका प्रवाशाला उतरून चालक अतरैला मार्गाच्या दिशेने जाऊ लागला. राजेशधरने आणखी एका व्यक्तीला महोखर येथे सोडायला सांगितलं. मात्र, चालक तयार नव्हता. परंतु, गाडीमालकाशी संवाद झाल्यानंतर तो महोखरला सोडायला तयार झाला. महोखरला प्रवाशाला सोडल्यानंतर चालक आणि राजेशधर यांच्यात पुन्हा वाद झाला.

हेही वाचा >> Cowin पोर्टलवरून डेटा लीक? टेलिग्रामवर करोडो लोकांचा वैयक्तिक तपशील उपलब्ध, केंद्र सरकार चौकशी करणार

चालकाने संतापून राजेशधर यांना गाडीतून धक्का मारून बाहेर काढलं. “माझ्या गाडीतून मी नेणार नाही”, असं चालक म्हणाला. त्यामुळे राजेशधर गाडीच्या समोर येऊन उभे राहिले. “मला का नेणार नाही?” असा प्रतिप्रश्न त्यांनी गाडीच्या समोर येऊन विचारलं. एवढ्यातच चालकाने बोलेरो गाडी राजेशधर यांच्यावर चढवली. गाडीच्या धक्क्याने राजेशधर बोलेरोच्या खालच्या भागात अडकले गेले आणि तशाच परिस्थितीत जवळपास २० मीटरपर्यंत फरफटत गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समजताच चालकाने ब्रेक दाबून गाडी थांबवली आणि घटनास्थळाहून पसार झाला. ही घटना घडली तेव्हा गाडीत तीन लहान मुले आणि काही ज्येष्ठ प्रवासी बसले होते.

ही घटना ऐकताच राकेशधर यांच्या पत्नी आणि मुलगी बेशुद्ध झाली. राकेशधर यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. ते दिल्लीत व्यवसाय करत होते. त्यांचं कुटुंबही दिल्लीतच राहतं. ही घटना घडल्यानंतर नातेवाईंकांनी रुग्णालयात आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांना तिथे पोहोचावं लागलं. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हे प्रकरण मिटवलं. पोलिसांनी पुढील तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bolero driver rammed grooms uncle after dispute in political debate in mirzapur sgk
Show comments