देशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षविरोधी आघाडीची मोट बांधण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना अन्यायाविरोधात एकत्रित करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. देशभरातून कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह तरुण कार्यकर्त्यांनी राहुल यांच्यासोबत दिल्लीपासून गल्लीपर्यंत कॉंग्रेसचा नारा सुरू केला आहे. राजकीय नेत्यांसह आता बॉलिवूड कलाकारही या भारत जोडो यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी सुरु झालेल्या या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्करनेही सहभाग घेतला. स्वराने राहुल यांच्यासोबत संवाद साधत पदयात्रा सुरु केली. राहुल गांधी यांच्यासोबत साधलेला संवाद आणि लोकांचं प्रेम प्रेरणादायी असल्याचं भास्कर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
स्वरा भास्कर यांनी ट्विट करत म्हटलं…
भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर स्वरा भास्कर यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, “भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली. या यात्रेची ताकद, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि प्रेम प्रेरणा देणारं आहे. दिवसेंदिवस मिळणारा लोकांचा उदंड प्रतिसाद, कॉंग्रेस नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांचा उत्साह या भारता जोडो यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळाला. राहुल गांधी यांना मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद आणि त्यांच्या मनात लोकांप्रती असणारं प्रेम अप्रतिम आहे.” जेव्हा समाजात क्रुरपणे भयंकर गुन्हे घडतात, त्यावेळी अनेकदा अशा गंभीर गोष्टींकडे दर्लक्ष केलं जातं. पण भारत जोडो यात्रा ही आशेचा किरण आहे. या यात्रेच्या माध्यमातून नफरतीचा प्रतिकार करणं शक्य होईल.
भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या लोकांना फावल्या वेळेत वाचनासाठी मोबाईल लायब्ररी (फिरते वाचनालय) सुरु करण्यात आलं आहे. या वाचनालयात इतिहासाशी संबंधित आणि राजकारणाची माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या कायदा समन्वयक अवनी बन्सल यांनी दिलीय. सामान्य नागरिकांमध्ये भारताची संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने हे वाचनालय सुरु करण्यात आले आहे.
आणखी वाचा – “हिंदू कधीही दंगलीत…”, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं विधान
भारत जोडो यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासोबत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, दिग्वीजय सिंह, माजी खासदार प्रमचंद गड्डू, माहिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शोभा ओझा यांनीही सहभाग घेतला होता. तसेच भारत जोडो यात्रेत सुरु करण्यात आलेल्या वाचनालयात पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावरील पुस्तके नागरिकांना वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.