पाश्र्वगायन करण्याची क्षमता अजूनही असली तरी अलीकडील काळात बॉलिवूड चित्रपटांसाठी आपण पाश्र्वगायन कमी केले आहे, याचे कारण जी गाणी आपल्याला देऊ करण्यात आली होती त्यात अजिबात सुरेलता नव्हती, अशी गाणी करणे आपल्याला पसंत नाही.. आजवर जे काही साध्य केले ते अन्य कुणाला साध्य होईल असे वाटत नाही..
गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ रसिकांवर सुरेल चांदण्याची शिंपण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी ही भावना व्यक्त केली. “चुरा लिया है तुमने”, “दम मारो दम”, “दिल चीज क्या है”, “मेरा कुछ सामान” यांसारख्या विविधरंगी आणि विविधढंगी गाण्यांनी रसिकांना मोहिनी घालणाऱ्या आशाताईंनी उद्याच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
आशाताई गेली साठ वर्षे हिंदी चित्रपटांसाठी गायन करीत आहेत. त्यांनी या काळात बारा हजार गाण्यांना स्वरकळा चढवली. त्यांची गाणी ही तरुण पिढीला सतत प्रेरणा देणारी आहेत. संगीतात तंत्रज्ञानाचा जास्त वापर मात्र त्यांना आवडत नाही. त्या म्हणतात, आता आपण पाश्र्वगायन फारसे करीत नाही, त्यात गंमतही उरली नाही, कारण सगळय़ाचे संगणकीकरण झाले आहे. आजच्या गाण्यांमध्ये गेयता नाही. कुणीतरी आपल्याला “दिल के झोपडी में मशाल जला दे” हे गाणे देऊ केले होते, पण ते नाकारले. “हलकट जवानी”सारखी गाणी आपण कधीच गाऊ शकणार नाही. आता आपल्याला सिद्ध करण्यासारखे काही उरलेले नाही.
आशा भोसले यांनी त्यांच्या आवाजाचा जो पल्ला राखला आहे तो लाजवाब आहे. चित्रपटसंगीत, पॉप, गझल, भजन, भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली, रवींद्र संगीत या संगीताच्या अनेक प्रांतांत त्यांनी लीलया संचार केला. त्यांनी हिंदीशिवाय इतर २० भारतीय भाषांत तसेच परदेशी भाषांतही गायन केले आहे.
आशाताईच्या मते आज बॉलिवूडमधील गाणी ही बीभत्स होत चालली आहेत. एक जुनी आठवण सांगताना त्या म्हणतात, “पिया तू अब तो आजा” या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी “माझी मुले हे गाणे ऐकल्यावर काय म्हणतील” असे म्हणत ते स्टुडिओतून निघून गेले होते. नातवंडांनाही आपली लाज वाटेल अशी गाणी गाण्याची आपल्याला इच्छा नाही. सध्या आपण श्रोत्यांशी थेट स्टेज शोच्या माध्यमातून संपर्कात आहोत.
आशा भोसले यांनी इंग्लिश गायक बॉय जॉर्ज व बॉयबंद कोड रेड यांच्यासमवेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यक्रम केले आहेत, त्याचा नवीन अल्बम या वर्षी येत आहे.
आपली जागा घेईल असे कुणी सध्यातरी या चित्रपट उद्योगात नाही असे त्या सांगतात. तसे आता कुणी नाही, कारण आपण वेगवेगळय़ा शैलीतील, भाषांतील गाणी दिली आहेत. रशियन, इंग्लिश या भाषातील गाणी सादर केली आहेत. मल्याळम भाषेतही गाणी केली आहेत. सध्या तरी तसे करणारे कुणी नाही.
आशाताई येत्या नोव्हेंबरमध्ये प्रसारित होणाऱ्या “माई” या चित्रपटात एकुलत्या एक मुलाने टाकून दिलेल्या आईची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात काम करताना मजा आली. हा चित्रपट पाहताना प्रत्येक महिला रडली नाही तर आपण नाव बदलून देऊ. पण आपला हा पहिला व शेवटचा चित्रपट आहे असेही त्यांनी जाहीर केले आहे.
चाळीसच्या दशकात आपली मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या छायेत वयाच्या पंधराव्या वर्षी आशाताईंनी पाश्र्वगायनातील कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ओ. पी. नय्यर, सचिनदेव बर्मन, राहुलदेव बर्मन, खय्याम, बप्पी लाहिरी आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी अनेक संस्मरणीय गाणी दिली. ए. आर. रहमान व अन्नू मलिक यांच्याबरोबर त्यांनी बाजीगर, रंगीला व ताल या चित्रपटांसाठी गाणी दिली.
पद्मविभूषण आशाताईंनी “जानम समझा करो” यासारखे अनेक अल्बमही काढले. ते लोकप्रिय झाले. हॉटेल व्यवसायातही त्यांनी पदार्पण केले असून, नोव्हेंबरमध्ये त्यांच्या “आशाज” या रेस्टॉरंटची शाखा काहिरा येथे सुरू होत आहे.
आपल्या अथक उत्साहाचे रहस्य काय हे सांगताना त्या म्हणतात, की त्यात काही रहस्य नाही. आपण संगीताशिवाय जगू शकत नाही. आपण नेहमी गात राहतो, त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते.

Story img Loader