आयसिस ही दहशतवादी संघटना भारतातील आपल्या सदस्यांपर्यंत बॉम्ब बनवण्याची माहिती पोहचविण्यासाठी एका नव्या मार्गाचा अवलंब करत असल्याची बाब उघड झाली आहे. ‘बॉम्ब बनाने का आसान तरीका’ ( बॉम्ब बनविण्याची सोपी पद्धत) असे शीर्षक असलेला व्हिडिओ ‘जस्टपेस्ट.इट’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आयसिसमध्ये सामील झालेल्या भारतीय तरूणांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘किक’सारख्या गुप्त संदेश माध्यमांचा आधार घेण्यात आला आहे. यामध्ये आगपेटीतील काडीसारख्या घरगुती गोष्टींपासून बॉम्ब कसा बनवता येईल, याचे धडे देण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ( एनआयए) आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. बेंगळुरूमधील एका चर्चवर २८ डिसेंबर २०१४ रोजी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी ‘सिमी’चा माजी सदस्य आलमबाझ आफ्रिदीला अटक करण्यात आली होती. आयसिसने पाठविलेल्या १२ पानी माहितीच्या मदतीने आपण हा बॉम्ब बनविल्याची कबुली आलमबाझने दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ‘किक’द्वारे आपल्याला ही माहिती पुरविल्याचे आलमबाझने चौकशीदरम्यान सांगितले. आफ्रिदीने तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीमध्ये, चर्चजवळ बॉम्बस्फोट करण्यासाठी काडीपेटी आणि साखरेच्या व अन्य मिश्रणाचा वापर केल्याचे सांगितले. आफ्रिदीला अटक झाल्यानंतर त्याच्याकडची माहिती ‘एनआयए’च्या हाती लागली होती. ही कागदपत्रे मध्य आशियात तयार करण्यात आली असून एका अज्ञात व्यक्तीने किक मेसेंजरद्वारे पोहचविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader