तेहरीक ए तालिबान-पाकिस्तानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
तालिबानच्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ११ जण ठार झाले, वायव्य पाकिस्तानात एका तपासणी चौकीवर झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांमध्ये सुरक्षा जवान व मुलांचा समावेश आहे. त्यात किमान ३० जण जखमी झाले असून अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला.
तालिबानने आठवडय़ात दुसरा आत्मघाती हल्ला केला असून खैबर आदिवासी भागात नवाब शहा यांच्या वाहनाजवळ आजचा स्फोट झाला होता. स्फोटक हे मोटरबाईकवर ठेवण्यात आले होते. मृतांमध्ये पोलिस, नागरिक व अधिकारी यांचा समावेश असून दोन मुले ठार झाल्याचे सांगण्यात येते. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. किमान ३१ जण या बॉम्बहल्ल्यात जखमी झाले असून वर्दळीच्या रस्त्यावर हा हल्ला करण्यात आला. पत्रकार मेहबूर शहा आफ्रिदी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे एक्स्प्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, घटनास्थळी असलेल्या मोटारी व वाहनांना आग लागली. खैबर हा पाकिस्तानचा स्वायत्त आदिवासी पट्टा असून पाकिस्तानी तालिबानशी सुरक्षा दलांचा सतत लढा चालू असतो. अफगाणिस्तानला पाकिस्तानी तालिबान्यांपासून धोका नाकारता येत नाही. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून आत्मघाती पथकाने हा बॉम्बस्फोट खासदर चौकीजवळ कारखानो बझार येथे केला, असे प्रवक्ता महंमद खोरसानी याने सांगितले. पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांची व आत्मघाती हल्ल्यांची संख्या वाढली असून दहशतवादी गट आदिवासी पट्टय़ात कारवाया करीत आहेत. बुधवारी तालिबानने पोलिओ लसीकरण केंद्राबाहेर बलुचिस्तानातील क्वेट्टा येथे आत्मघाती हल्ला केला होता, त्यात १५ जण ठार झाले होते.