किस्तानच्या वायव्य भागात शियापंथीयांच्या एका मिरवणुकीवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात सात जण ठार झाले तर १८ जण जखमी झाले. मोहरमनिमित्त शियापंथीयांनी मिरवणूक काढली होती तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात दडवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडविण्यात आला. अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यामुळे केला जात आहे.
शहराच्या जवळच असलेल्या डेरा इस्माइल खान येथे मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी इमामबाराह येथून मिरवणूक निघाली असता रस्त्यातील कचऱ्यात दडवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. या शक्तिशाली स्फोटात चार मुलांसह सात जण ठार झाले. तर दोन मुले आणि दोन पोलीस जखमी झाले.
जवळपास १० किलो स्फोटके आणि बॉलबेअरिंग्जच्या साहाय्याने बॉम्ब तयार करण्यात आला होता. स्फोट होताच बॉलबेअरिंग्ज उडाल्याने जवळच्या घरांच्या भिंतींना तडे गेले. स्फोट होताच डेरा इस्माइल खान जिल्ह्य़ातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.
कराची, लाहोर, क्वेट्टा या शहरांसह अन्य ५० शहरांमध्ये मोबाइल दूरध्वनी सेवा खंडित करण्यात आली असून जवळपास १२ ठिकाणी दुचाकीवर पाठीमागील स्वार बसविण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्ताने अंतर्गत सुरक्षामंत्री रेहमान मलिक यांनी अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवलेली असतानाही हा स्फोट झाला.
इस्लामाबादमध्ये शियापंथीयांच्या मिरवणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरचाही वापर केला. मात्र तो निष्फळ ठरल्याचे स्फोटावरून सिद्ध झाले, असे बोलले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomb blast in pakistan on shia muslims rally