कोलकात्त्याच्या हावडा रेल्वे स्थानकात काल मध्यरात्रीच्या सुमारास बॉम्ब आढळून आला. स्थानकात उभ्या असणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाकडून हा क्रूड बॉम्ब ताब्यात घेऊन तो सुरक्षित स्थळी नेण्यात आला. काल रात्री हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्स्प्रेस गाडीच्या एका डब्यात सफाई सुरू असताना पॉलिथीनच्या आवरणात लपेटलेले पाच पाईदसदृश वस्तू सफाई कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडल्या होत्या. या वस्तू बॉम्बसारख्या दिसत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर तत्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा हावडा स्थानकातील लांब पल्ल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.