मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी देशात वाढणाऱ्या सायबर गुन्हेगारीवरुन चिंता व्यक्त केली आहे. देशात सध्या खळबळ माजवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही चिंता बोलून दाखवली आहे. श्रद्धाची तिचाच प्रियकर आफताब पूनावाला याने हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करत विल्हेवाट लावली. न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी यानिमित्ताने सध्याच्या काळात इंटरनेट सर्वांसाठी उपलब्ध असताना होणारे परिणाम दाखवणारी ही दुसरी बाजू असल्याचं सांगितलं आहे.
पुण्यात टेलिकॉम, ब्रॉडकास्टिंग, आयटी आणि सायबर क्षेत्रातील यंत्रणांशी संबंधित विषयावर आयोजित परिषदेत संबोधित करताना दीपांकर दत्ता यांनी परखडपणे आपली मतं मांडली. “तुम्ही सर्वांनी नुकतंच वृत्तपत्रात श्रद्धा वालकर प्रकरणाबद्दल वाचलं असेल. इंटरनेटवर सर्व साहित्य उपलब्ध असल्यानेच अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत,” असं दीपांकर दत्ता यांनी सांगितलं.
Shraddha Walkar Murder: “आफताबचे ते शब्द ऐकून मी खालीच कोसळलो…”, श्रद्धाच्या वडिलांनी मांडली व्यथा
“आता सरकार योग्य दिशेने विचार करत असेल याची मला खात्री आहे. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखण्यासाठी, तसंच न्याय मिळवून देण्याचं आपलं उद्दिष्ट असेल तर भारतीय दूरसंचार विधेयकाच्या माध्यमातून मजबूत कायद्याची आवश्यकता आहे,” असं दीपांकर दत्ता म्हणाले आहेत.
“सध्याच्या युगात नवीन साधनं उपलब्ध होत आहेत. १९८९ मध्ये आपल्याकडे मोबाइल फोनही नव्हते. दोन ते वर्षांनी आपल्याकडे पेजर आले. त्यानंतर मोटोरोलाचे ते मोठे मोबाइल आणि आता छोटे फोन आले आहेत ज्यामध्ये आपण विचारही करु शकत नाही इतक्या गोष्टी समाविष्ट आहेत. पण ते मोबाइलही कोणी हॅक करु शकतं. आपल्या गोपनीयतेवर हल्ला केला जाऊ शकतो,” असं त्यांनी म्हटलं.
नेमकी घटना काय?
वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरचा तिचाच प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केले. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.