नेसले कंपनीच्या मॅगी नूडल्सच्या विक्रीवर घालण्यात आलेली बंदी काही अटींवर उठविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सहा आठवड्यांनंतर मॅगीच्या विक्रीला देशभरात पुन्हा सुरुवात होऊ शकेल. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नेसले कंपनीला दिलासा मिळाला आहे.
मॅगीमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिशाचे प्रमाण निर्धारित मात्रेपेक्षा जास्त असल्याने वेगवेगळ्या राज्यांनी मॅगीच्या विक्रीवर बंदी घातली होती. त्यानंतर नेसले कंपनीने देशातील बाजारपेठेतून मॅगी परत घेण्याचा निर्णय घेतला होता. या विषयावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर गुरुवारी अंतरिम निकाल देण्यात आला. ज्या प्रयोगशाळांमध्ये मॅगीची चाचणी घेण्यात आली होती. त्या वैध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे बंदी घालण्याचा निर्णय कायदेशीर ठरत नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
न्यायालयाने नेसले कंपनीला तीन प्रयोगशाळांमधून मॅगीची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. या चाचणीचे निकाल येण्यासाठी साधारपणे सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. जर या चाचण्यांमध्ये मॅगीत मोनोसोडियम ग्लुटामेट आणि शिशाचे प्रमाण निर्धारित मात्रे इतके आढळले, तरच त्यानंतर मॅगीची विक्री करता येऊ शकते, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा