परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीत झाले. परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा टाळावा याबाबत या पुस्तकात विद्यार्थ्यांना मौलीक सल्ले देण्यात आले आहेत.
पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अनेकदा विद्यार्थ्यांना सल्ले देत असतात. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी ते विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमही करतात. यातूनच या पुस्तकाची कल्पना आकाराला आली आणि त्यांनी या विषयावरील आपल्या विचारांचे संकलन करण्याचे ठरवले. २०८ पानांचे हे पुस्तक पेंग्विन रँडन हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले असून, ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित करून देशभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या पुस्तकात, कुठलाही तणाव किंवा चिंता याशिवाय परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी जवळजवळ २५ ‘मंत्र’ दिले आहेत.
परीक्षेशी संबंधित ताणाशी कसे जुळवून घ्यावे, परीक्षेच्या काळात शांत कसे राहावे, तसेच परीक्षा संपल्यानंतर काय करावे यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर त्यात भर देण्यात आला आहे, असे प्रकाशकांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.