नवी दिल्ली : सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे करोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळण्याचे संकेत आहेत. ‘‘देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असून, अमृत महोत्सवानिमित्त १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत वर्धक मात्रा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला’’ अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. करोना प्रतिबंधक लशीची पहिली आणि दुसरी मात्रा केंद्र सरकारने मोफत दिली होती. खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरणाचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला होता.

 आत्तापर्यंत ९६ टक्के पात्र लोकांना पहिली, तर ८७ टक्के पात्र नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील ७७ कोटी लोकसंख्येपैकी १ टक्क्यांहूनही कमी नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, ६० आणि त्याहून अधिक वयोगटातील सुमारे १६ कोटी पात्र लोकसंख्येपैकी सुमारे २६ टक्के नागरिकांना तसेच, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून देशभर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली़  दोन्ही मात्रा घेतलेल्या बहुतांश नागरिकांनी वर्धक मात्रेकडे मात्र पाठ फिरवली़  आता वर्धक मात्राही मोफत देण्यात येणार असल्याने लसीकरणाची टक्केवारी वाढेल, असे मानले जाते.

लसीकरणाला गती

सहा महिन्यांनी शरीरातील प्रतिपिंडांचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे वर्धक मात्रा घेण्याची गरज असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवडय़ात सर्व लाभार्थ्यांसाठी दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रेतील कमी करून ते नऊ महिन्यांऐवजी सहा महिने केले. आता मोफत वर्धक मात्रा देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने लसीकरणाला आणखी गती दिली आहे.