Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
‘टीव्ही ९ मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आज (मंगळवार) बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी त्यांना बेळगाव दौरा करण्यास मनाई केली होती. तरीही ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील पाच-ते सहा वाहनांवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यातील काही वाहनं पुण्यातील आहेत.
हेही वाचा- विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?
या प्रकारानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांसह नारायण गौडा यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.