आपल्या चीनभेटीत उभय देशांमधील सीमाप्रश्नावरील ‘सहकार्य करार’ हाच अत्यंत कळीचा मुद्दा असेल, असे संकेत डॉ. मनमोहन सिंग यांनी दिले आहेत. पंतप्रधानांनी चीन आणि रशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर प्रयाण करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या विषयी सूतोवाच केले. मात्र आपल्या निवेदनात, रशियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या कुडनकुलम् येथील आण्विक ऊर्जा प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत कोणताही उल्लेख त्यांनी केलेला नाही.
चीनशी मैत्रीपूर्ण संबंधांचा इतिहास
भारत आणि चीन या देशांमध्ये असलेले संबंध हे ऐतिहासिक आहेत. तसेच उभय देशांमधील मतभेदावरही अत्यंत प्रगल्भतेने तोडगा काढण्यात येत आहे. या दोन देशांमधील एकूण वातावरण परस्परांबद्दलच्या सौहार्दतेने भरलेले आहे, असे डॉ. सिंग यांनी निवेदनात नमूद केले आहे. यापैकीच काही प्रश्नांची उकल शोधण्यासाठी मी चीनच्या पंतप्रधानांशी चर्चा करणार आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
सामंजस्य करार
भारत आणि चीन ही दोन्ही राष्ट्रे ‘सीमा सुरक्षा सहकार्य करारा’च्या मसुद्यावर खल करीत आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकमक होऊ नये तसेच चीनकडूनही भारताच्या हद्दीत घुसखोरी होऊ नये, यादृष्टीने हा प्रयत्न करण्यात येत आहे. या सामंजस्य कराराच्या मसुद्यावर या भेटीदरम्यान उभयपक्षी स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.