Border Infra Projects : चीनकडून वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने सीमेवर पायाभूत सुविधा सुधारण्याचं काम सुरू केलं आहे. आता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) चीनच्या सीमेवर पुढील काही आठवड्यामध्ये विशिष्ट पायाभूत सुविधांचं काम पूर्ण करणार आहे. यामध्ये लेहच्या पर्यायी मार्गावरील रस्त्यांच्या पॅचचा समावेश आहे. ज्यामुळे सर्व हवामान कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यात मदत होईल. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमा रस्ते कार्यक्रमांतर्गत इतर प्रकल्पांनाही प्राधान्य दिले आहे. उत्तराखंडमधील मानसरोवर यात्रा मार्गावरील लिपुलेख खिंडीपर्यंत संपूर्ण कनेक्टिव्हिटी स्थापित करण्यास प्राधान्य देण्यासह यामध्ये लेहच्या पर्यायी मार्गावरील रस्त्यांचे पॅचिंग आणि सर्व हवामान संपर्क सुनिश्चित करण्याचा समावेश आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
लेहला जाण्यासाठी तीन मार्ग
लेहला जाण्यासाठी सध्या तीन मार्ग आहेत. यामध्ये पहिला जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर-झोजिला-कारगिल मार्गे, दुसरा मार्ग हिमाचल प्रदेशातील मनाली-रोहतांग मार्गे, तर हा मार्ग दारचा नावाच्या ठिकाणी वळतो. पदम आणि निमू मार्गे लेहला जोडणारा हा तिसरा मार्ग आहे. लेहमध्ये जाण्यापूर्वी हा मार्ग हिमाचल प्रदेशातील बरलाचा ला आणि लडाखमधील कारू मार्गे तंगलांग ला या पर्वतीय खिंडीतून जातो. मात्र, सध्या लेहच्या या दोन्ही मार्गांवर सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी नाही. लेहला जाण्यासाठी श्रीनगर-लेह आणि बरलाचा ला-करू-लेह हे जुने मार्ग आहेत.
हेही वाचा : भारताच्या दृष्टीने चीन ही विशेष समस्या! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मत
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, निमू-पदम-दारचा रस्त्याचा ४ किमी लांबीचा न कापलेला भाग आणि मनाली-दारचा-पदम-निमू अक्षावरील ४.१ किमी लांबीच्या ट्विन ट्यूब शिंकू ला बोगद्याला जोडण्याचं काम सुरू आहे. निमू-पदम-दारच्या या रस्त्याच्या ४ किमी लांबीच्या कच्च्या भागाला जोडण्याचं काम पूर्णत्वास आलं आहे. उर्वरित काम येत्या काही आठवड्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये त्यांच्या द्रास भेटीदरम्यान शिंकुन ला बोगदा प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ केला होता. आता या बोगद्याचे काम सुरु होणार आहे.
१५,८०० फूट उंचीवर जगातील सर्वात उंच बोगदा बनेल. १,६८१ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा बोगदा मनाली आणि लेहमधील ६० किमीचं अंतर कमी करेल. यामुळे निमू-पदम-दारचा रस्त्याच्या ४ किमी लांबीच्या भागाशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. लेहच्या इतर दोन जुन्या मार्गांना पर्यायी असणारा हा सर्व हंगामात खुला असणारा तिसरा मार्ग असेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) समांतर जाणाऱ्या रस्त्यांपैकी एकाशी कनेक्टिव्हिटी स्थापित करणे हा देखील ‘बीआरओ’चा एक प्रमुख प्राधान्य प्रकल्प आहे.
चार वर्षात वेगानं काम झालं
सध्याच्या २५५ किमी लांबीच्या दुर्बुक-श्योक-दौलत बेग ओल्डी (DS-DBO) रस्त्याव्यतिरिक्त इतर दोन रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी एलएसीला समांतर आहेत. एक रस्ता लेह आणि डेमचोकला कारू आणि न्योमा मार्गे जोडतो आणि दुसरा डर्बुक ते न्योमाला चुशुल मार्गे जोडतो. जो पँगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिणेस आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्व लडाखमधील लेह-डेमचोक रस्त्याशी कनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या रस्त्याचे बहुतांश बांधकाम पूर्ण झालं आहे.