चंडीगड : पंजाबमधील पाकिस्तान सीमेजवळ तैनात सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी भारतीय हवाई हद्दीचा भंग करणारे पाकिस्तानी स्वयंचलित विमान (ड्रोन) पाडले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानच्या हद्दीतून पहाटे साडेचार वाजता एक ‘ड्रोन’ भारतीय हद्द ओलांडण्याच्या प्रयत्नांत होते. तेव्हा शाहपूर सीमा चौकीवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. या वेळी अंधार असल्याने पुरेशा प्रकाशासाठी रोषणाई करणारे बाँबही डागण्यात आले.
भारतीय हद्दीत घुसल्यावर लगेचच हे ‘ड्रोन’ पाडण्यात आले. या ‘ड्रोन’ला एक दोरखंड लावलेला होता. यानंतर परिसरात शोधमोहीमही सुरू करण्यात आली आहे.
सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक पंकजकुमार सिंग यांनी बुधवारी सांगितले होते, की सीमेपलीकडून होणारे संभाव्य ‘ड्रोन’ हल्ले व घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल सदैव सजग व सज्ज आहे.