रसिका मुळ्ये
चित्रा मेडिकल सायन्स इन्स्टिटय़ूटचे संशोधन
अकाली जन्मलेल्या बालकांना ऊब देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महागडय़ा पेटय़ांना (इन्क्युबेटर) पर्याय म्हणून केरळच्या चित्रा मेडिकल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटने एक उपकरण तयार केले असून ते दहा हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही ही सुविधा स्वस्तात मिळू शकेल.
त्याचप्रमाणे रोजच्या रोज इन्शुलिनचे इंजेक्शन टोचून घेण्यापासून मधुमेहींची सुटका करणारी ‘मायक्रो नीडल’ संस्थेने तयार केली असून त्याच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.
अकाली जन्माला आलेल्या बाळांना इन्क्युबेटरमध्ये ठेवले जाते. बाळाला आवश्यक तेवढी ऊब देण्याचे काम इन्क्युबेटर करते. बहुतेक मोठय़ा रुग्णालयांमध्येच इन्क्युबेटरची सुविधा असते. सध्याची यंत्रणा ही काहीशी खर्चीक असल्यामुळे ग्रामीण भागांतील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इन्क्युबेटरची सुविधा मिळत नाही. मात्र आता अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये बाळाला आवश्यक तेवढी ऊब देणारे उपकरण उपलब्ध होणार आहे. पंजाबमधील फगवाडा येथे ‘भारतीय विज्ञान काँग्रेस’मध्ये ‘प्राइड ऑफ इंडिया’ या प्रदर्शनात संस्थेच्या यासह अनेक वैद्यकीय संशोधने आणि उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे.
गादीसारखे दिसणाऱ्या या उपकरणाचे तापमान नियंत्रित ठेवता येते. अगदी गंभीर परिस्थिती असलेल्या बाळांसाठी नाही, परंतु अकाली जन्म झालेल्या आणि बाकी अडचणी नसलेल्या बाळांसाठी याचा उपयोग होऊ शकतो, असे चित्रा इन्स्टिटय़ूटमधील संशोधक डॉ. नरेश कासोजू यांनी सांगितले.