वाढती महागाई आणि ‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना दिलासा मिळाला आहे. बोरिस जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकला आहे. २११ विरुद्ध १४८ मतांनी बोरिस जॉन्सन यांनी हा ठराव जिंकत पंतप्रधानपद कायम ठेवलं. एकूण ३५९ मतं नोंदवण्यात आली. यामधील २११ खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर विश्वास दाखवला.

बोरिस जॉन्सन यांना आपल्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने पंतप्रधान काळातील सर्वात कठीण परीक्षेला सोमवारी सामोरं जावं लागलं. लॉकडाउन काळात निर्बंध असतानाही बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत १० डाउनिंग स्ट्रिट येथे पार्टी केली होती. यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांच्याच पक्षातील ४० खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

‘पार्टीगेट’ घोटाळ्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर प्रचंड दबाव होता. भारत दौऱ्यादरम्यानही हा दबाव कायम होता. पार्टीगेट घोटाळ्यावरून टीका होत असतानाच कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या तब्बल ५४ खासदारांनी राजीनाम्याची मागणी केली. यामुळे विश्वासदर्शक ठरावाची १५ टक्के आवश्यकता पूर्ण झाली होती. यासोबत पंतप्रधान जॉन्सन यांचे भवितव्य ठरवण्यासाठी मतपत्रिका घेण्यात आली.

बोरिस जॉन्सन यांना अविश्वास ठराव जिंकण्यासाठी १८० खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता. मतदानाआधी बोरिस जॉन्सन यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पुन्हा एकदा पक्षाला विजय मिळवून देऊ असा विश्वास दिला.

Story img Loader