एकेकाळी संगणक आज्ञावली तयार करण्यात मग्न असलेली व्यक्ती, सर्वच विषयात थोडे ज्ञान असलेली व्यक्ती, केवळ अभ्यासात रस असलेली पुस्तकी कीडा असलेली व्यक्ती किंवा सामाजिक कौशल्यात कमी पडलेल्या व्यक्तीला ‘गीक’ या शब्दाने संबोधले जात असे पण तंत्रज्ञानाचा महिमा असा की, कॉलिन्स शब्दकोशाने आता या शब्दाचा समावेश ‘वर्षांतील शब्द’ म्हणून केला आहे. ट्वेरकिंग, बिटकॉइन, फ्रॅकिंग व फॅबलेट हे शब्द शर्यतीत होते, त्यांना मागे टाकून ‘गीक’ या शब्दाने बाजी मारली आहे.
शब्दांचेही स्थान काळानुसार बदलू शकते हे यातून स्पष्ट होत आहे. ‘गीक’ या शब्दाचा आताचा अर्थ मात्र बदललेला असून विशिष्ट विषयातील ज्ञानी, उत्साही व्यक्तीला ‘गीक’ असे म्हटले जाते. कॉलिन्स शब्दकोशाने गीकरी, गीक चिक व गीकडम हे शब्द अगोदरच समाविष्ट केलेले आहेत. यातील गीक चिक या शब्दाचा अर्थ फॅशन स्टाइल असा आहे. गीकरी म्हणजे एखाद्या विषयावर अगोदरच ज्ञानाने परिपूर्ण असणे, असा अर्थ आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगातील संदर्भ घ्यायचा म्हटला तर ‘गीक’ या शब्दाची अवस्था तुका म्हणे पहा शब्दचि हा देव शब्देचि गौरव पूजा करू.. अशी आहे. एकेकाळी भणंग अवस्था असलेल्या या शब्दाचा हा गौरव त्याला शब्दरत्नाचे रूप देऊन गेला आहे.
कॉलिन्स शब्दकोशाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, जे लोक इंटरनेटच्या जन्मापूर्वीच्या पिढीतील आहेत त्यांच्यासाठी गीक हा शब्द नकारार्थी अर्थाचा होता यात शंका नाही कारण त्याचा अर्थच सामाजिकदृष्टय़ा अनाकर्षक, कंटाळवणा असा होता. काळ बदलला तसे आपण बदललो नाही तर ते योग्य नाही. २००३ मध्ये कॉलिन्सच्या शब्दकोशात हा शब्द आला व त्याचा आता जुना अर्थ जाऊन वर सांगितलेला ज्ञानी व्यक्ती हा नवा अर्थ आला आहे. गेल्या महिन्यात ऑक्सफर्ड शब्दकोशाने सेल्फी हा शब्द ‘वर्षांतील शब्द’ म्हणून निवडला होता त्याचा अर्थ स्मार्टफोन किंवा वेबकॅमच्या मदतीने स्वत:च स्वत:चे छायाचित्र काढून ते सोशल मीडिया संकेतस्थळावर टाकणारी व्यक्ती असा आहे. गेल्या दोन दशकात गीक या शब्दाच्या अर्थात जे बदल होत गेले ते सकारात्मक होते. १९९० च्या दशकात संगणक उद्योगातील अनेक ज्ञानवंतांना यश मिळाले होते, त्यामुळे खऱ्या अर्थाने या शब्दाच्या अर्थछटा बदलण्यास सुरुवात झाली होती.विशेष म्हणजे शब्दकोशात मॅरेज म्हणजे विवाह या शब्दाची फेरव्याख्या करण्यात आली आहे कारण २९ मार्चला इंग्लंड व वेल्स येथे समलिंगी विवाह झाले त्यामुळे विवाह म्हणजे स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध असा अर्थ होता तो बदलून दोन व्यक्तींनी कायदेशीररीत्या एकत्र राहणे असा करण्यात आला आहे.

Story img Loader