बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी बॉम्बस्फोट नेमका कोणी घडवला, याबद्दल अमेरिकी तपाससंस्था एफबीआय अद्याप अनभिज्ञ आहे. बोस्टन शहरासह संपूर्ण अमेरिका सोमवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनी हादरले. तब्बल एक तपानंतर दहशतवाद्यांनी अमेरिकेला लक्ष्य केले. स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटांमागे नक्की कोणाचा हात आहे, याची माहिती काढण्यात एफबीआयचे अधिकारी तूर्ततरी अपयशी ठरले आहेत. घटनास्थळी प्रेशरकुकरमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. त्यातूनच हा स्फोट घडविण्यात आला होता.
स्फोटामुळे तुकडे तुकडे झालेल्या प्रेशरकुकरचे आणि काळ्या रंगाच्या एका बॅगेचे छायाचित्र एफबीआयने मंगळवारी प्रसिद्ध केले. बोस्टनमधील मॅरेथॉनचे चित्रीकरण करणाऱया किंवा छायाचित्रे काढणाऱया सामन्य नागरिकांना कोणाची हालचाल संशयस्पद होती, असे जाणवत असेल, तर त्यांनी तातडीने एफबीआयच्या अधिकाऱयांशी संपर्क साधावा, असे आवाहन सामान्य लोकांना करण्यात आले आहे.
दोन्ही स्फोट हे दहशतवादी हल्लाच होते, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले. मात्र, नियोजनबद्धपणे हे स्फोट घडविण्यात आले की ऐनवेळी स्फोटके पेरण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. स्फोटामागे अमेरिकेतील नागरिकाचा हात आहे की बाहेरच्या व्यक्तीचा हे शोधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.