लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दाक्षिणेतले प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राजही आता निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. सेंट्रल बंगळुरूमधून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मोदी सरकारवर टीका करणं आणि समाजातील अनेक प्रश्नांवर रोखठोक मत मांडणारे प्रकाश राज गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. आता त्यांनी देशातले दोन मोठे पक्ष अपयशी ठरल्याचं म्हणत भाजप- काँग्रेसवर टीका केली आहे.
‘आता सामान्य माणसांचा आवाज संसदेत पोहोचणं गरजेचं आहे. राजकारण हे नेहमीच घाणेरडं असतं अशी टीका केली जाते, मात्र बदल घडवायला कोणीही पुढे येत नाही. आता बदल घडवण्याची वेळ आली आहे’ असं म्हणत पुन्हा एकदा प्रकाश राज यांनी मोदी सरकार आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
‘भाजप नेहमी हिंदुत्त्ववाद पुढे करत आला आहे तर काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांकांचा वापर करत आहेत. हे दोन्ही मोठे पक्ष देशात अपयशी ठरले आहेत. या दोन्ही पक्षांनी देशासाठी काहीच केले नाही आता सामान्य नागरिकांनी पुढे आलंच पाहिजे’ असं प्रकाश राज एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
प्रकाश राज हे सेंट्रल बंगळुरू मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. ‘मी लहानाचा मोठा बंगळुरूमध्ये झालो. मला या विभागाची माहिती आहे. मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.