पीटीआय, चंडीगड
शंभू आणि खनौरी सीमाबिंदूंवरून निदर्शक शेतकऱ्यांना दूर केल्यानंतर हरियाणा सुरक्षा दलांनी गुरुवारी रस्त्यांवरील अडथळे हटविण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी हे अडथळे उभारण्यात आले होते. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा धरणे धरण्याचा इशारा दिला आहे.
शंभू आणि खनौरी सीमेवर अडथळे हटविण्यासाठी जेसीबीसह इतर साहित्य आणण्यात आले आहे. वर्षभरापासून बंद असलेला हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाला. यापूर्वी शेतकरी या ठिकाणी निदर्शने करीत होते. शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’चा नारा दिला होता. सुरक्षा दलाने पंजाबबरोबर असलेल्या राज्याच्या सीमा सील केल्या होत्या. मोठे लोखंडी खिळे, तारांच्या सहाय्याने सीमा बंद करण्यात आल्या होत्या.
‘दोन शेतकरीविरोधी पक्ष एक’
नवी दिल्ली: शंभू आणि खनौरी येथून शेतकऱ्यांना हटविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी भाजप आणि आम आदमी पक्षावर टीका केली. ‘दोन शेतकरीविरोधी पक्ष शेतकऱ्यांविरुद्ध एक आले आहेत, असे वाटत आहे,’ असे खरगे म्हणाले. सत्तेचा विखार भाजप आणि आपच्या डोक्यातही आहे. ‘पंजाब सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आणि नंतर बळपूर्वक निदर्शनाच्या ठिकाणावरून हटविले,’ असे खरगे म्हणाले.
खासदारांची निदर्शने
नवी दिल्ली: सरकारने शेतकऱ्यांना हटविल्याच्या भूमिकेविरोधात पंजाबमधील काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात गुरुवारी निदर्शने केली. खासदार सुखजिंदर रंधावा, अमरिंदरसिंग राजा, गुरजित औजला आणि धरमवीर गांधी यांनी संसदेच्या मकरद्वाराबाहेर निदर्शने केली.