उधाणलेला समुद्र…किनाऱ्याची कोणतीच चिन्ह नाहीत…आणि आधाराला फक्त एक लाकडी फळी! पण अवघ्या १२ वर्षांच्या एका मुलानं २६ तास त्या भीषण आणि भयावह परिस्थितीशीही कडवी झुंज दिली आणि शेवटी तिला पराभूत करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बीचवर भावंडांसोबत खेळत असताना गायब झालेला लखन देवीपूजक थेट दुसऱ्या दिवशी समुद्रात लांबवर फक्त एका लाकडी फळीच्या आधारावर तरंगत असलेला सापडला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला! नेमकं काय घडलं होतं?
समोर आलेल्या माहितीनुसार, हे सगळं घडलं २९ सप्टेंबर रोजी. १२ वर्षांचा लखन देवीपूजक त्याच्या करण (१२) व अंजली (८) या भावंडांसोबत सुरतच्या दमस समुद्र किनाऱ्यावर खेळत होता. सोबत आजी शेवंताबेन देवीपूजकही होती. “खेळता खेळता करन समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. लखननं त्याला घट्ट पकडलं आणि पाण्याबाहेर खेचलं. पण करनला बाहेर काढताना लखन पाण्यात खेचला गेला. हे साधारण दुपारी दीडच्या सुमारास घडलं”, अशी माहिती लखनचे काका विजय देवीपूजक यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
शोधमोहिमेतही लखन सापडला नाही!
“लखनच्या आजीनं मदतीसाठी आरडाओरड केली. काही तरुण लागलीच लखनला शोधण्यासाठी पुढे सरसावले. पण त्यांना लखन सापडला नाही. अग्निशमन विभाग आणि दमस पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी शोधमोहीम हाती घेतली. पण लखनचा कुठेच पत्ता नव्हता”, असं विजय देवीपूजक यांनी सांगितलं.
…आणि लांब समुद्रात काहीतरी हलताना दिसलं!
दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी नवसारी जिल्ह्यात्या भाट गावातले मच्छीमार रसिक तांडेल (४८) हे त्यांच्या एका सहकाऱ्यासमवेत समुद्रात बोट घेऊन गेले. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितला. “आम्हाला लांब काहीतरी हलताना दिसलं. नेमकं काय ते कळलं नाही. त्यामुळे आम्ही आणखी पुढे गेलो. जवळपास १२ नॉटिकल मैल. काही अंतरावर मला काहीतरी संशयित दिसलं. आम्ही आणखी पुढे गेल्यावर एक हात हलताना दिसला. आम्ही बुचकळ्यात पडलो. समुद्राच्या मध्यभागी इतक्या आत एक मुलगा फक्त एका लाकडी फळीच्या मदतीनं तरंगताना दिसत होता. आम्ही त्याच्या दिशेनं दोर फेकला आणि त्याला बोटीत ओढून घेतलं. अशा प्रकारे समुद्राच्या मध्यावर २६ तास तग धरून राहण्याच्या त्याच्या जिद्दीला खरंच सलाम आहे”, असं ते म्हणाले.
“आम्ही त्याला चहा, पाणी आणि कोरडे कपडे दिले. ब्लँकेट दिलं. आपल्या भावाला वाचवताना आपला तोल कसा गेला हे त्यानं आम्हाला सांगितलं. त्यानं त्याच्या वडिलांचा आणि काकांचा नंबर दिला. वायरलेस सेटच्या माध्यमातून आम्ही नवसारीच्या धोलई बंदरावर परतणाऱ्या एका बोटमनशी बोललो. त्यानं मरीन पोलिसांना याची माहिती दिली आणि त्या मुलाच्या पालकांचा नंबरही दिला”, अशी माहिती रसिक तांडेल यांनी दिली.
तिसऱ्या दिवशी बोट किनाऱ्यावर आली!
“तांडेल यांनी पाठवलेली माहिती मिळाल्यानंतर आम्ही धोलई बंदरावर रुग्णवाहिका आणि डॉक्टर पाठवले. मुलाच्या कुटुंबीयांनाही त्याची माहिती दिली. रविवारी, अर्थात १ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता रसिक तांडेल यांची नवदुर्गा बोट धोलई बंदरावर आली. आम्ही लखनची वैद्यकीय तपासणी केली. कुटुंबीयांशी भेट झाल्यानंतर लखनला निराली रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे एक दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला सोमवारी घरी पाठवण्यात आलं”, अशी माहिती पोलीस निरीक्षक एम. आर. छावडा यांनी दिली.
गणेशमूर्ती बसवलेली फळी!
लखनचे काका विजय म्हणाले, “२८ सप्टेंबरला गणेश विसर्जन झालं. मोठ्या मूर्तींचं दमासच्या समुद्रात विसर्जन करण्यात आलं. २९ तारखेला रात्री लखन समुद्रात स्वत:चा बचाव करत असताना गणेश मूर्तीसाठीची अशीच एक लाकडी फळी त्याच्या बाजूला पाण्यावर तरंगत आली. त्या फळीच्या आधारे तो तग धरून राहिला. गणपतीनंच लखनचा जीव वाचवला”.
लखनच्या वडिलांनी तर तो जिवंत परत येईल याची आशाच सोडली होती. त्याच्या अंत्यसंस्कारांसाठी ते लखनचा मृतदेह शोधत होते! “तो जिवंत येईल अशी आशा आम्ही सोडली होती. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्ही त्याचा मृतदेह शोधत होतो. पण आम्ही जेव्हा त्याला जिवंत पाहिलं, तेव्हा आम्ही नि:शब्द झालो! आम्ही रसिक तांडेल यांची भेट घेतली आणि त्यांचे मनापासून आभार मानले”, अशी प्रतिक्रिया लखनचे वडील विकास देवीपूजक यांनी दिली.