होळीच्या मुहूर्तावर ‘सर्फ एक्सल’च्या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर ट्रोल झालेली हिंदुस्तान यूनिलीव्हर कंपनी आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी कंपनीच्या ‘ब्रूक बॉन्ड रेड लेबल टी’ या ब्रँडला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. याला कारण ठरलंय ते म्हणजे गणेश चतुर्थीबाबतची एक जाहिरात.

ही जाहिरात कंपनीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या आधी प्रदर्शित केली होती, पण एका वर्षानंतर ती चर्चेत आहे आणि ट्विटरवर #BoycottRedLabel टॉप ट्रेंड होत आहे. या जाहिरातीत हिंदू-मुस्लीम ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. पण, अनेक नेटकऱ्यांना ही जाहिरात रुचलेली नाही. या जाहिरातीतून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत, नेहमी हिंदूंनाच का शिकवण दिली जाते अशाप्रकारचे ट्विट करत नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत.

काय आहे जाहिरात –

या जाहिरातीत, एका मुस्लीम मूर्तीकाराकडे एक हिंदू व्यक्ती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी जातो. दोघांमध्ये चर्चा होते आणि अखेरीस तो हिंदू व्यक्ती एक मूर्ती घेण्याचं ठरवतो. इतक्यात ‘अजान’चा आवाज ऐकून तो मुस्लीम मूर्तीकार डोक्यावर टोपी घालतो. मूर्तीकार मुस्लीम असल्याचं पाहून तो हिंदू ग्राहक जरा विचारात पडलेला या जाहिरातीत दाखवला असून त्यामुळे तो तेथून बाप्पाची मूर्ती खरेदी करणं टाळण्याचा प्रयत्न करतो असं या जाहिरातीत दाखवलं आहे. ‘आज काही महत्त्वाचं काम आहे, मी उद्या येतो’, असं म्हणत तो ग्राहक तेथून जाण्याच्या प्रयत्नात असताना मूर्तीकार त्याला किमान चहा तरी प्यावा अशी विनंती करतो. चहा पिताना मूर्तीकार त्या ग्राहकाला, नमाज पठण करणारे हात जर बाप्पाची मूर्ती सजवणार असतील तर आश्चर्य वाटणारच ना… असं म्हणतो. त्यावर तुम्ही हेच काम का करतात? असं तो ग्राहक विचारतो. त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही देखील एकप्रकारची ईश्वरसेवा आहे असं हा मूर्तीकार म्हणतो. मूर्तीकाराच्या या बोलण्याने प्रभावित होऊन तो ग्राहक बाप्पाची मूर्ती लगेच खरेदी करण्यास तयार होतो, असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे.

पाहा जाहिरात आणि त्याखालील युजर्सच्या प्रतिक्रिया –

 


‘या जाहिरातीतून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत, नेहमी हिंदूंनाच का शिकवण दिली जाते’, अशाप्रकारचे ट्विट करत नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत.

Story img Loader