भारत पेट्रोलियम कॉपरेरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) संयुक्त प्रकल्पासाठी कोळसा पुरवण्याचे कंत्राट हैदराबादस्थित कंपनीला देण्यासाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप बीपीसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. के. सिंह यांनी केला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली व केंद्रीय दक्षता आयोगाकडे पाठवले आहे.
बीपीसीएलच्या मध्य प्रदेशमधील बिना येथील भारत ओमान रिफायनरी लि. (बीओआरएल) या प्रकल्पातील कंत्राटावरून हा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे साडेपाच लाख टन कमी काजळी निर्माण करणारा कोळसा पुरवण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. खैरे यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलावून हे कंत्राट गंधार कोल अ‍ॅण्ड माइन्स या पात्र कंपनीला न देता हैदराबाद येथील एमबीजी कमॉडिटीज प्रा. लि. या कंपनीला देण्याची सूचना केली, असा आरोप  सिंह यांनी ६ ऑगस्ट रोजी पाठवलेल्या पत्रात केला आहे. गंधार कंपनी निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवत असल्याचे खैरे यांनी म्हटले होते. मात्र, आपण बीओआरएलमार्फत त्याची खातरजमा केली असता त्यात काही तथ्य आढळले नाही, असे सिंह यांनी म्हटले आहे. हे कंत्राट ५ ऑगस्ट रोजीच गंधार कोल अ‍ॅण्ड माइन्सला बहाल केल्याचेही त्यांनी नमूद केले.
सिंह यांच्या आरोपांबाबत विचारणा केली असता, ‘गंधारला कंत्राट देऊ नका, असे आपण सिंह यांना सांगितले होते’ अशी कबुली खैरे यांनी दिली. परंतु, गंधार ही कंपनी शुल्क बुडवत असल्याने व दुसरी पात्र कंपनी तांत्रिकदृष्टय़ा अपात्र असल्याने आपण एमबीजीला कंत्राट देण्याचे सुचवल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा