BPSC protests Prashant Kishor granted bail : पाटणा येथील गांधी मैदानात अमरण उपेषणाला बसलेले जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना अटक केल्यानंतर काही तासांनी कुठल्याही अटींशिवाय जामीन मंजूर करण्यात आला आहे. बिहारची राजधानी पटणा येथील गांधी मैदान येथे प्रशांत किशोर हे मागच्या आठवड्यापासून उपोषणाला बसले होते. दरम्यान त्यांना सोमवारी पहाटे ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पण किशोर यांनी सशर्त जामीन नाकारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
बीपीएससी विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून गांधी मैदान येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ प्रशांत किशोर २ जानेवारी पासून उपोषण करत आहेत. गेल्या महिन्यात घेण्यात आलेली बीपीएससी पूर्व परीक्षा रद्द करावी यासाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत, या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी प्रशांत किशोर आंदोलनात सहभागी झाले आहे
अटक झाल्यानंतरही प्रशांत किशोर यांनी आपण तुरूंगात देखील आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी जामीनसाठी कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये ही अट असेल तर जामीनासाठी मागणी करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, प्रशांत किशोर यांना गांधी मैदानात उपोषण केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार या मैदानात आंदोलन करण्यास मनाई आहे.
पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “पोलिसांनी प्रशांत किशोर यांना अटक केली आणि इतर ४३ जणांना ताब्यात घेतले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने आंदोलन करणाऱ्या बीपीएससीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.” दरम्यान या विद्यार्थ्यांना नंतर पोलिसांनी सोडून दिले, तर प्रशांत किशोर यांना पाटणा येथील एम्स आणि नंतर आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेण्यात आले.
त्यापाठोपाठ किशोर यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले जेथे त्यांनी सशर्त जामीन स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयातून तुरूंगात नेले जात असताना किशोर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आमचे आंदोलन हे नितीश कुमार-भाजपा सरकारच्या लाठी संस्कृतीच्या विरोधात आहे. माझे बेमुदत उपोषण तुरूंगातूनही सुरूच राहिल. जोपर्यंत राज्य सरकार बीपीएससी पूर्व परीक्षा पुन्हा घेण्याचा आदेश देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल”.
प्रशांत किशोर यांचे वकील शिवानंद गिरी म्हणाले की, “जामीनासाठीच्या अटी मान्य करण्याचा अर्थ प्रशांत किशोर यांनी आपला गुन्हा मान्य केला असा होईल. आंदोलने आणि धरणे हे प्रत्येकाचे लोकशाहितील अधिकार आहे. आम्ही आमच्या पुढील कायदेशीर कारवाईबाबत नंतर चर्चा करू.”
यादरम्यान बीपीएससी विद्यार्थी आपल्या नियोजीत आंदोलनस्थळी परत गेले जेथे आधीपासून विद्यार्थ्यांचा एक गट आंदोलन करत आहे. प्रशांत किशोर यांनी गेल्या आठवड्यात उपोषण सुरू करण्याच्या दोन दिवस आधी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हा प्रश्न ४८ तासात सोडवावा, अन्यथा आपण तीव्र आंदोलन करू असा अल्टिमेटम दिला होता.
BPSC वादात काय काय घडलं?
बीपीएससीद्वारे १३ डिसेंबर रोजी एका परीक्षेचा पेपर लिक झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार घातला.
यानंतर आयोगाने १२ हजार उमेदवारांची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी असे आदेश दिले.
या आदेशानंतर ४ जानेवारीला शहरातल्या विविध केंद्रांवर नव्याने परीक्षेचं आयोजन करण्यात आलं. ९११ केंद्रांवर परीक्षा योग्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
मात्र BPSC च्या परीक्षार्थी उमेदवारांनी समान संधी निश्चित करा असं सांगत सगळ्या केंद्रांवर पुन्हा आंदोलन सुरु केलं.
उमेदवार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अपक्ष खासदार पप्पू यादव आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिला. प्रशांत किशोर यांनी तर उपोषणही सुरु केलं. मात्र आज त्यांना अटक करण्यात आली.