Brad Pitt Dating SCAM : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एका फ्रेंच महिलेची अशाच प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून एका दुसर्‍याच व्यक्तीचे सोंग घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेची चक्क हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिटच्या नावाने फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात ॲनी नावाच्या ५३ वर्षीय महिलेने अभिनेत्याच्या उपचारासाठी मदत म्हणून ८३०,००० युरो इतकी रक्कम गमावली आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, फसवणूक झालेल्या महिलेने फ्रेंच चॅनल TF1 माहिती दिली की, फेब्रुवारी २०२३ मध्ये इंटिरिअर डिझायनर असलेल्या ॲनीला ब्रॅड पिटची आई असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीकडून सोशल मीडियावर मेसेज पाठवण्यात आला. अ‍ॅनीने टिग्नेस (Tignes) येथे एक महागड्या स्की ट्रिपवर गेल्याची पोस्ट केली होती. त्यानंतर तिला हा मॅसेज पाठवण्यात आला होता. या पोस्टनेच फसवणूक करणार्‍यांचे लक्ष अ‍ॅनीकडे वेधून घेतलं असू शकतं असं सांगितलं जात आहे.

थोड्या कालावधीनंतर ब्रॅड पिट असल्याचे भासवणाऱ्या एका अकाउंटवरून पुन्हा एकदा अ‍ॅनीला मेसेज पाठवण्यात आला. फसवणूक करणार्‍याने ब्रॅड पिटच्या आईने तिच्याबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी सांगितल्याचा दावा केला. या मैत्री पूर्ण संभाषणामुळे त्या दोघांमधील विश्वास वाढल्याचं अ‍ॅनीनं सांगितलं.

अ‍ॅनीने BFMTV शी बोलताना सांगितलं की, “तुमच्याबद्दल असं काहीतरी लिहिणारे पुरूष फार कमी आहेत. मी ज्याच्याशी बोलत होते तो माणूस मला आवडला. त्याला महिलांशी कसं बोलावं हे माहित होतं, अशा गोष्टी नेहमीत फार काळजीपूर्वक केल्या जातात”.

अॅनीला सुरुवातीला संशय आला, पण फसवणूक करणार्‍याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेले ब्रॅड पीटचे फोटो आणि व्हिडीओ पाठवल्यानंतर काही काळानंतर तिचा पूर्ण विश्वास बसला.

काही दिवसानंतर या खोट्या ब्रॅड पीटने अ‍ॅनीला महागडं गिफ्ट देण्याचं वचन देत मागणी देखील घातली. पण यामध्ये एक अडचण होती, हे महागडे गिफ्ट मिळवण्यासाठी तिला कस्टम फी म्हणून काही रक्कम द्यावी लागणार होती. यामध्ये तिने ९,००० युरो दिले. अॅनी पैसे ही ठराविक रक्कम देण्यासाठी तयार झाल्यानंतर या मागण्या हळूहळू वाढू लागल्या.

लक्षाधीश पतीकडून घटस्फोटानंतर आपल्याला मोठी रक्कम मिळणार असल्याचे अ‍ॅनीने फसवणूक करणाऱ्या मित्राला सांगितले होते. हीच संधी साधून फसवणूक करणाऱ्याने त्याची रक्कम वाढवण्यासा सुरूवात केली. इतकेच नाही तर किडनीच्या उपचारासाठी आपल्याला पैसे हवे आहेत, पण अँजेलिना जोल बरोबर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याने आपण आपल्या खात्यातील पैसे काढू शकत नाही असंही अॅनीला पटवून देण्यात आलं.

आपण सांगतोय त्यावर विश्वास बसावा म्हणून फसवणूक करणाऱ्याने हॉस्पिटलच्या बेडवर पडून असलेल्या ब्रॅट पिटचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले फोटो देखील पाठवले. दोघांमध्ये टेक्स मेसेज आणि फोटोंची देवाणघेवाण सातत्याने सुरू असताना फसवणूक करणार्‍याने फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉल करणे मात्र टाळले.

फसवणूक झाल्याचं कसं कळलं?

माध्यमांमध्ये अभिनेता ब्रॅड पिट याला त्याची नवीन गर्लफ्रेंड इनेस डी रॅमन (Ines de Ramon) बरोबरचे पाहिल्यानंतर अ‍ॅनीला संशय आला. पण तोपर्यंत या ‘रिलेशनशिप’ ॲनने जवळजवळ एक दशलक्ष युरो गमावले होते. ॲनीने पुढे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि या प्रकरणाचा तपास सुरू झाला. बीएफटीव्हीने डेली मेलच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार अ‍ॅनी ही सध्या डिप्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

Story img Loader