गेल्या आठवड्यात सोशल मीडियात एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक मुजोर तरुण एका आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करताना दिसत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्याच्या कुब्री गावात घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. यातल्या आरोपी तरुणाचं नाव प्रवेश शुक्ला असं असून त्याने एका आदिवासी मजुरावर दादागिरी करत त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर लघुशंका केली होती.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या आदेशांनंतर आरोपी प्रवेश शुक्ला याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९४, ५०४ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने प्रवेश शुक्लाच्या घरावर बुलडोजर चढवला आहे. आरोपीच्या घराचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे. प्रशासनाने त्याच्या घराचा काही भाग पाडला आहे.
एकीकडे प्रवेश शुक्ला याच्याविरोधात लोक संताप व्यक्त करत असताना ब्राह्मण महासभा त्याच्या समर्थनात मैदानात उतरली आहे. ब्राह्मण महासभेने प्रवेश शुक्लावरील कारवाईविरोधात आंदोलन केल्याचा एक व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केला आहे. यात एक आंदोलक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर प्रवेश शुक्लाचं समर्थन करताना दिसतोय.
या व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे की, हा तर नीचपणाचा कळस! मध्यप्रदेशात एका व्यक्तिच्या अंगावर लघुशंका करणारा भाजप नेता प्रवेश शुक्लाच्या समर्थनार्थ ब्राम्हण महसभेतर्फे आंदोलन. यांचे तर्क आणि भाषा ऐकली की असे लोक माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे सुद्धा वाटत नाहीत. भाजपचे नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या राज्यातील हे प्रताप पाहताय ना!
हे ही वाचा >> कलम ३७० हटवण्याविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात २ ऑगस्टपासून सुनावणी
आंदोलकाने काय म्हटलंय?
काँग्रेसच्या दाव्यानुसार व्हिडीओमध्ये दिसणारा आंदोलक व्यक्ती ब्राह्मण महासभेचा कार्यकर्ता आहे. तो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतोय. यात आंदोलकाला पत्रकाराने म्हटलं की आरोपीने गुन्हा केलाय ना? त्यावर आंदोलक म्हणाला, कसला अपराध, लघुशंका करणं हा अपराध? कोणत्या कलमाअंतर्गत हा अपराध आहे? ती व्यक्तीसुद्धा (आदिवासी मजूर) नशेत होती. त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणं हा गुन्हा आहे.