ब्राह्मोस या जगातील वेगवान युद्धजहाज विरोधी क्रूझ क्षेपणास्त्राने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या ब्राह्मोसची मंगळवारची चाचणी हे ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने टाकण्यात आलेले एक यशस्वी पाऊल आहे. या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची मोबाइल लाँचरवरुन घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली तसेच ठरवलेले सर्व निकष पूर्ण केले.
यावेळी चाचणीसाठी जे ब्राह्मोस वापरण्यात आले त्यामध्ये भारतीय कच्चा मालापासून काही भाग बनवण्यात आले होते. ब्राह्मोसची फ्युल मॅनेजमेंट सिस्टीम, एअरफ्रेम यंत्रणेसाठी भारतीय कच्चा माल वापरण्यात आला. यापूर्वी आपल्याला या भागांसाठी रशियावर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे हे यश खूप मोठे असून मेक इन इंडियाच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे. यामुळे ब्राह्मोसच्या निर्मितीसाठी होणारा खर्चही कमी होणार आहे.
ब्राह्मोसचे आयुर्मान वाढवण्यासाठी सोमवारी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही चाचणी घेण्यात आली. ब्राह्मोस आता १० ऐवजी १५ वर्ष कार्यरत राहू शकते. आयुर्मान वाढवणात आलेले ब्राह्मोस हे भारतातले पहिले क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्राचा कार्यकाल वाढल्यामुळे खर्च कमी हेणार आहे. ब्राह्मोसच्या खरेदीमध्ये अनेक देशांनी रस दाखवला असून या क्षेपणास्त्राचा भारतीय लष्कर आणि नौदलामध्ये समावेश करण्याता आला आहे.
ब्राह्मोसचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे इंडियन एअर फोर्सही सुखोई-३० एमकेआय या फायटर विमानातून हे क्षेपणास्त्र डागू शकते. ब्राह्मोस आणि सुखोईची जोडी हे सुद्धा भारतीय तंत्रज्ञानचे एक मोठे यश आहे. यामुळे रणांगणात भारताची क्षमता कैकपटीने वाढेल. ब्राह्मोस जमीन, युद्धजहाज, पाण्याखालून आणि हवेतून डागता येऊ शकते. ब्राह्मोसच्या निर्मितीमध्ये रशियावरील अवलंबित्व कमी होणे ही सुद्धा खूप मोठी बाब आहे.