ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची चाचणी रविवारी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची या विनाशिकेवरून पश्चिम किनारपट्टीवर घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र फिरत्या स्वयंचलित प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले. दुपारी १.१० वाजता ही चाचणी घेण्यात आल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

या क्षेपणास्त्राने त्याचे लक्ष्य अचूक भेदले. यापूर्वी ९ एप्रिलला या क्षेपणास्त्राची चाचणी अपयशी झाली होती. उड्डाणातील सर्व अपेक्षित गोष्टी क्षेपणास्त्राने साध्य केल्या आहेत.

आज या क्षेपणास्त्राची ४७वी चाचणी घेण्यात आली. ब्राह्मोस एअरस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुधीर मिश्रा यांनी सांगितले, की आज ब्राह्मोसची चाचणी घेण्यात आली असून ते लक्ष्य अचूक भेदू शकते हे स्पष्ट झाले आहे.

ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची निर्मिती भारत व रशिया यांनी संयुक्तपणे केली आहे. हे बहुद्देशीय क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला २९० कि.मी. आहे, तर वेग २.८ मॅक इतका आहे. ते जमीन, सागर, उपसागर व हवेतून सागरी व जमिनीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते. लवकरच हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानांवर लावले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

 

Story img Loader