कॅनडाच्या ब्रॅम्पटनमध्ये श्री भगवद्गीतेचे नाव देण्यात आलेल्या उद्यानातील फलकाची तोडफोड केल्याप्रकरणी भारताच्या निषेधानंतर शहराच्या महापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला आहे. देखभाल आणि पुनर्मुद्रणाच्या कामामुळे हा फलक रिकामा दिसत असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. पूर्वी ट्रॉयस पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानाचे नुकतेच ‘श्री भगवद्गीता उद्यान’ असे नामकरण करण्यात आले आहे.
“या उद्यानातील फलकाच्या तोडफोडीच्या वृत्तानंतर, आम्ही चौकशी करत त्वरित कारवाई केली आहे. हे फलक तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात आले असून विकासकाकडून ते बदलण्यात येणार आहे”, असे ब्रॅम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी सांगितले आहे. ही बाब लक्षात आणुन दिल्याबद्दल ब्राऊन यांनी भारतीय समाजाचे आभार मानले आहेत.
“आम्ही श्री भगवद्गीता उद्यानामध्ये घडलेल्या द्वेषपूर्ण गुन्ह्याचा निषेध करतो. कॅनेडाचे अधिकारी आणि पोलिसांनी दोषींवर तात्काळ कारवाई करावी”, असे कॅनेडातील भारतीय उच्चायुक्तांनी ट्वीटमध्ये म्हटले होते. या ट्वीटनंतर ब्रॅम्पटनच्या महापौरांनी कारवाईबाबत माहिती दिली आहे.