पीटीआय, रिओ द जानेरो
गतवर्षी दिल्लीमधील शिखर परिषदेप्रमाणेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना अद्याप समर्पक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ब्राझिलच्या रिओ द जानेरो शहरात सुरू झालेल्या जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर संमेलनात ते बोलत होते. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात सुरू झालेली मानवकेंद्रित निर्णयांची परंपरा ब्राझिलनेही कायम राखल्याचे ते म्हणाले.

जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांचा महत्त्वपूर्ण गट असलेल्या ‘जी-२०’ गटाची शिखर परिषद रिओ द जानेरोमध्ये सुरू झाली. ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनाशिओ लुला डिसिल्वा यांनी परिषदेला सुरुवात करताना गरिबी, भूक आणि हवामान बदलासारख्या संकटांचा सामना करण्याचे आवाहन केले. डिसिल्वा यांनी परिषदेसाठी आगमन झालेल्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. मोदी यांच्यासह अमेरिकेचे मानवळते अध्यक्ष जो बायडेन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आदी महत्त्वाचे नेते या परिषदेसाठी दाखल झाले आहेत. उद्घाटनाचे भाषण करताना डिसिल्वा यांनी जगभरात हवामान बदलाचे विध्वंसक परिणाम दिसत आहेत असे सांगत त्याविरोधात धैर्याने कृती करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा :Indian Coast Guard : Video : पाकिस्तानी जहाजाचा दोन तास पाठलाग; ७ मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने ‘अशी’ केली सुटका

भूराजकीय स्थितीवर एकमताची शक्यता नाही

इस्रायल-हमास, इस्रायल-हेजबोला, रशिया-युक्रेन ही युद्धे संपलेली नाहीत. दुसरीकडे, हवामान बदलाच्या संकटाचे गांभीर्य अजिबात मान्य न करणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भू-राजकीय स्थितीबद्दल अर्थपूर्ण जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता नाही असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्याऐवजी ब्राझीलचे प्राधान्य असलेल्या भुकेचे उच्चाटन यासारख्या सामाजिक मुद्द्यांवर हा जाहीरनामा आधारित असेल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. भू-राजकीय आव्हानाचा अगदीच पुसटसा उल्लेख केला जाईल असा अंदाजही निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.