लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेल्या ब्राझीलमध्ये कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाने अध्यक्ष डिल्मा रूसेफ यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डिल्मा यांच्या विरोधकांना ५१३ पैकी ३४२ म्हणजे दोन तृतीयांश मते आवश्यक होती, ती मिळाली आहेत. त्यामुळे आता हा प्रस्ताव सिनेटकडे जाईल. तेथे डिल्मा यांच्यावर महाभियोग चालवायचा की नाही याचा निर्णय मे महिन्यात होईल. कनिष्ठ सभागृहात पाच तासांच्या चर्चेनंतर डिल्मा रूसेफ यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवायचा की नाही या मुद्दय़ावर चर्चा झाली. एकूण ३४२ मते मिळाल्यानंतर विरोधकांनी सभागृहात एकच जल्लोष केला. रूसेफ यांच्या समर्थकांनी मात्र ऑलिम्पिक जवळ आले असताना विरोधकांनी हे योग्य केले नाही अशी टीका केली. सभागृहाबाहेर हजारो लोक मोठय़ा टीव्ही पडद्यांवर सभागृहाचे कामकाज पाहत होते. रूसेफ समर्थक व विरोधक हे या वेळी उपस्थित होते. मारिस्टेला डिमेलो यांनी सांगितले, की डिल्मा यांच्यावर महाभियोग चालवलाच पाहिजे. या वेळी हजारो पोलिसांनी रोसेफ समर्थक विरोधक यांच्यात असलेल्या धातूच्या लांब भिंतीनजीक कडक बंदोबस्त ठेवला होता. डिल्मा रूसेफ यांच्यावर महाभियोग चालवण्यावर सिनेटने शिक्कामोर्तब केले तर उपाध्यक्ष मिशेल टेमर हे अध्यक्ष होतील असे चित्र आहे. डिल्मा यांना पदावरून दूर केले, तरी त्याला फारसा अर्थ नाही कारण टेमर अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांना मंदीचा व राजकीय निष्क्रियतेचा सामना करावा लागणार आहे. टेमर यांना सत्ता सांभाळणे सोपे जाणार नाही असे विश्लेषकांचे मत आहे. डिल्मा रूसेफ यांच्यावर महाभियोग चालवायचा की नाही याचा अंतिम निर्णय सिनेटमध्ये मे महिन्यात होणार आहे.

Story img Loader