ब्राझील सरकारने भारत बायोटेक या कोव्हॅक्सिन उत्पादक कंपनीशी केलेला लस खरेदीचा करार वादात सापडला आहे. ब्राझीलमधील व्हिसलब्लोअरनी या कराराबद्दल गंभीर आरोग्य मंत्रालयातील अधिकारी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांच्यावर गंभीर आरोप केले. हा मुद्दा ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर सरकारने लस खरेदी करार स्थगित केला. या वृत्तानंतर भारत बायोटेकने करार आणि लसीच्या किंमतीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकसोबत केलेला लस खरेदी करारावरून ब्राझीलमध्ये मोठा वाद उभा राहिला आहे. आधीच करोना परिस्थिती हाताळण्यावरून राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो लक्ष्य ठरत असतानाच या मुद्द्याने वातावरण तापलं. ज्यामुळे ब्राझील सरकारला लस खरेदी कराराला स्थगितीच द्यावी लागली. ब्राझीलचे आरोग्यमंत्री मार्सेलो यांनी याबाबतची घोषणाही केली.

ब्राझील सरकारने कराराला स्थगिती दिल्यानंतर भारत बायोटेकने होत असलेल्या आरोपांबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत बायोटेकने निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यात कराराची प्रक्रिया आणि लसीच्या किमतीबद्दलही खुलासा करण्यात आला आहे. “ब्राझीलकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कोव्हॅक्सिन लस करार टप्प्याटप्याने करण्यात आला. कराराची ही प्रक्रिया आठ महिने चालली. कोव्हॅक्सिनला ४ जून २०२१ रोजी आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर २९ जूनपर्यंत ब्राझीलला लसींचा पुरवठा करण्यात आलेला नाही, त्याचबरोबर ब्राझीलकडूनही रक्कम मिळालेली नाही,” असं भारत बायोटेकने म्हटलं आहे.

हेही वाचा- ‘भारत बायोटेक’ला बसणार फटका?; भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझीलसोबतची ३२ कोटी डॉलर्सचं डील स्थगित

“भारताबाहेर म्हणजेच इतर देशांना कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यासाठी लसीचा प्रति डोस १५-२० डॉलर हा दर निश्चित करण्यात आलेला आहे. तर ब्राझीलसाठी प्रति डोस ५ डॉलर हा दर निश्तित केलेला आहे. कोव्हॅक्सिनला १६ देशांमध्ये आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. यामध्ये भारतासह भारत, फिलिपाईन्स, इराण, मेक्सिको या देशांचाही समावेश आहे. तर ५० देशांमध्ये आपातकालीन वापरासाठीची परवानगी प्रक्रिया सुरू आहे,” असं भारत बायोटेकने स्पष्ट केलं आहे.

लस खरेदी व्यवहाराबद्दल नेमका आरोप काय?

ब्राझील सरकारने भारत बायोटेककडून लस खरेदी करण्यासाठी करार केला. भारत बायोटेककडून लस खरेदी हाच मूळ वादाचा विषय ठरला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस खरेदी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल राष्ट्राध्यक्षी जाइर बोल्सोनारो यांना माहिती होती, मात्र त्यांनी लस खरेदी करार थांबवला नाही. ज्यामुळे ब्राझीलला महागडी लस खरेदी करावी लागली. ब्राझीलकडे फायझरची लस खरेदी करण्याचा पर्याय होता. पण त्यांनी भारत बायोटेककडून महागडी लस खरेदी केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. लस खरेदी कराराबद्दल करण्यात आलेले हे आरोप सिद्ध झाले, तर बोल्सोनारो यांना पद गमवावं लागू शकतं, तर भारत बायोटेकला ३२ कोटी डॉलर्सचा फटका बसू शकतो.

Story img Loader