World Records : प्रेम असेल तर कोणतंही नातं दीर्घकाळ टिकू शकतं, मग कोणत्याही अडचणी आल्या तरी असं म्हटलं जातं. ब्राझीलच्या एका जोडप्याने याची प्रचिती दिली आहे. मॅनोएल (१०५) आणि मारिया (१०१) या जोडप्याने सर्वात जास्त काळ वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम केला आहे. मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलं आहे. ब्राझीलमधील या जोडप्याच्या लग्नाला ८४ वर्षे ७७ दिवस झाले असून हे जोडपे सर्वात जास्त काळ जगणारे जोडपे बनले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅनोएल आणि मारिया या दोघांची प्रेमकहाणी १९३६ मध्ये सुरू झाली होती. हे दोघे १९३६ मध्ये पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतर १९४० मध्ये त्यांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली, तेव्हापासून ते आजतागायत दोघेही सुंदर आयुष्य जगत आहेत. मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो या जोडप्याला १३ मुले असून आज त्यांचा परिवार खूप मोठा आहे. त्यांच्या कुटुंबात १०० पेक्षा जास्त नातवंडे आहेत.

या ब्राझिलियन जोडप्यापूर्वी कॅनडाचे डेव्हिड जेकब हिलर आणि सारा ड्यू हिलर हे सर्वात जास्त काळ जगणारे जोडपे होते. मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो यांनी त्यांच्या संसाराला १९४० मध्ये सुरुवात केली. मात्र, सुरुवातीला मारियाच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल शंका होती. पण मॅनोएलने तिचं मन जिंकण्यात यश मिळवलं. आता या जोडप्याचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त आहे. वृद्धापकाळात मॅनोएल आणि मारिया आपले जीवन शांततेत जगत आहेत.

दरम्यान, त्यांना सुखी वैवाहिक आयुष्याचे रहस्य विचारलं असता त्यांनी ‘प्रेम’ असं उत्तर दिलं. अनेक दशकं या जोडप्याने त्यांच्या वाढत्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तंबाखूची लागवड करून शेतीत परिश्रमपूर्वक काम केल्याचं ते सांगतात. हे जोडपे सर्वात जास्त काळ जगणारे जोडपे बनले असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.