लंडनच्या वेम्बली मध्ये हैदराबादच्या २७ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी ही विद्यार्थिनी लंडनमध्ये आली होती. तेजस्विनी रेड्डी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती मुळची हैदराबादची आहे. एका ब्राझिलियन माणसाने तिच्यावर चाकू हल्ला केला आणि तिला ठार केलं आहे. तेजस्विनीचा मृत्यू या हल्ल्याच्या जागीच झाला. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एका २८ वर्षीय महिलेवर चाकू हल्ला झाला. तिला रुग्णालयात नेण्यात आलं, तिला गंभीर जखमा झालेल्या नाहीत आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत.
चाकू हल्ल्यात जिचा मृत्यू झाला ती तेजस्विनी हैदराबादची होती. तेजस्विनीचा चुलत भाऊ विजयने सांगितलं की तेजस्विनीवर ज्याने हल्ला केला तो ब्राझिलियन माणूस होता. आठवडाभरापूर्वीच तो इथे रहायला आला होता. तेजस्विनी मास्टर्सची पदवी घेण्यासाठी मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून लंडनमध्ये आली आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?
पोलिसांनी ही माहिती दिली आहे की चाकू हल्ला प्रकरणात आम्ही दोघांना ताब्यात घेतलं आहे. हे हल्लेखोर २४ वर्षीय पुरुष आणि २३ वर्षीय महिला आहेत. पुरुषाला आम्ही ताब्यात घेतलं आणि महिलेला सोडलं आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली. तसंच आणखी एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे.