ब्राझीलमध्येही करोनाही थैमान घातलं असून आतापर्यंत ३९०४ जणांना विषाणूंची लागण झाली असून ११४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र यानंतरही ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो लॉकडाउनच्या विरोधात आहेत. जैर बोल्सोनारो यांना करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची कमी आणि अर्थव्यवस्थेची चिंता जास्त सतावत आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसंबंधी बोलताना त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं असून एक दिवस असेही आपण सगळे मरणार आहोत असं म्हटलं आहे.

जैर बोल्सोनारो यांनी करोनाला अत्यंत सामान्य फ्लू म्हटलं असून देशातील नागरिकांना अर्थव्यवस्था थांबता कामा नये असं आवाहन केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अध्यक्ष जैर बोल्सोनारो आणि स्टेट्स गव्हर्नर यांच्यातील नाराजी समोर आली आहे. काही राज्यांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. पण जैर बोल्सोनारो मात्र लोकांना वारंवार कामावर परतण्याचं आवाहन करत आहेत. असं न केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं ते म्हणत आहेत. इतकंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला मान्य करण्यास ते नकार देत असून लोकांनी असंच आवाहन करत आहेत.

करोनामुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही महत्त्वाचे नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण जैर बोल्सोनारो नियमांचं पान करण्यास नकार देत असून त्यांची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अमरान खाम यांच्याशी केली जात आहे. कारण दोघांनीही आपल्या देशात लॉकडाउन करण्यास नकार दिला होता.

कोणत्याही परिस्थितीत आपण लॉकडाउन जाहीर करणार नसल्याच्या भूमिकेवर जैर बोल्सोनारो ठाम आहेत. लोक तर मरणारच पण त्यासाठी अर्थव्यवस्था बंद केली जाऊ शकत नाही असं ते म्हणाले आहेत. इतकचं नाही तर राज्यांचे गव्हर्नर मृतांचा आकडा फुगवून सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण याचा कोणताही पुरावा ते सादर करु शकलेले नाहीत.

गेल्या आठवड्यात जैर बोल्सोनारो यांनी देशाला संबोधित करताना प्रसारमाध्यमं करोनासंबंधीची माहिती वाढवून सांगत असल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर ६० हून जास्त वयाच्या लोकांना लागण होण्याची शक्यता असताना शाळा का बंद आहेत असा अजब सवालही त्यांनी विचारला होता.

Story img Loader