हिवाळी अधिवेशनात १३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत दोन तरुण शिरले होते. त्यांनी लोकसभेत उड्या मारल्या आणि धूर पसरवला. या दोघांनाही खासदारांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे दोन तरुण जेव्हा आत शिरले त्याच वेळी बाहेरही दोन जण घोषणाबाजी करत होते. या चौघांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा हा अद्यापही फरार आहे. ललित झाकडे सगळ्यांचे मोबाइल आहेत. तो घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलिसांना असं वाटतं आहे की या प्रकरणाचा मास्टमाईंड तोच आहे. जे लोकसभेत घडलं त्यामागे मोठा कट आहे असं पोलिसांना वाटतं आहे. पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यांच्या चौकशीत हे समोर आलं आहे की १३ डिसेंबरला हा गोंधळ घालायचा हे ललित झाने त्यांना सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेवटचं लोकेशन काय होतं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ डिसेंबर या दिवशी गदारोळ घालायचा हे ललित झाने सांगितलं होतं. ललित झानेही या सगळ्यांना गुरुग्रामला भेटायला बोलावलं होतं. संसदेत गदारोळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे. हे सगळेजण गदारोळ घालत असताना ललित झाने त्यांचा व्हिडीओ काढला तो सोशल मीडियावर अपलोडही केला. चारही आरोपींनी ललितचं नाव घेतलं आहे. तो सगळ्या आरोपींच्या संपर्कात होता. त्याने चारही आरोपींचे फोन ताब्यात घेतले होते आणि तो व्हिडीओ अपलोड झाल्यावर तिथून फरार झाला. पोलिसांना हा संशय आहे की चारही आरोपींच्या मोबाइलमध्ये महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. तसंच हा कट नेमका कसा आखला गेला याचे पुरावेही मिळण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. त्यामुळे पोलीस आता ललित झाचा शोध घेत आहेत. ललित झाचं शेवटचं लोकेशन राजस्थानातलं नीमराणा होतं. त्यानंतर पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ललित झाशी संबंधित एनजीओचीही चौकशी सुरु

ललित झाशी संबंधित पश्चिम बंगालच्या एका एनजीओचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. या एनजीओला निधी कुठून दिला जातो याचीही चौकशी केली जाते आहे. कारण याच एनजीओमध्ये ललित झाला जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतो. पोलिसांनी सांगितलं ललित झा हा पेशाने शिक्षक आहे. तसंच लोकसभा सुरक्षा गदारोळ प्रकरणातला मास्टर माईंड आहे. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे. ललित झा आणि त्याचे सहकारी ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर भगत सिंग यांचा प्रभाव होता. या सगळ्यांना असं काहीशी गोष्ट करायची होती ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे जावं. या सगळ्यांच्या एखाद्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे कुठलेही पुरावे किंवा धागेदोरे हे पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत. हे सगळेजण फेसबुकच्या एका पेजवरुन संपर्कात होते. फेसबुकवर हे सगळे ‘भगतसिंग फॅन पेज’शी जोडले गेले होते आणि त्याच माध्यमातून संपर्कातही आले होते.

जाणून घ्या आरोपींनी कट कसा आखला?

१) सगळे आरोपी सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबशी जोडले गेले होते. दीड वर्षापूर्वी या सगळ्यांची भेट मैसूर या ठिकाणी जाली होती. नऊ महिन्यांनंतर त्यांची भेट परत झाली. त्यावेळी त्यांनी संसदेत गदारोळ घालण्याचा कट रचला.

२) यावर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी मनोरंजन डी हा आरोपी बंगळुरुतून आला होता. त्याने व्हिजिटर पास घेतला आणि संसदेची रेकी केली होती.

३) जुलै महिन्यात सागर लखनौहून दिल्लीला आला. मात्र त्याला संसद भवनात जाता आलं नव्हतं. त्याने संसदेची बाहेरुन रेकी केली होती.

४) रेकीच्या वेळी मनोरंजन डी ला हे समजलं की संसदेत प्रवेश करताना बूट तपासले जात नाहीत.

५) १० डिसेंबरला हे सगळेजण एक – एक करुन आपल्या राज्यांमधून दिल्लीला आहे. मनोरंजन हा विमानाने दिल्लीला आला.

६) सगळे आरोपी १० डिसेंबरच्या रात्री गुरुग्राम या ठिकाणी विक्की आणि वृंदा यांच्या घरी पोहचले होते. त्यावेळी उशिरा ललित झा हा तरुणही तिथे पोहचला होता.

७) अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातला आहे. तो महाराष्ट्रातून धूर असलेले फटाके घेऊन आला होता. सागर शर्मा याने १३ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता खासदार प्रताप सिन्हा यांच्या स्वीय सचिवाकडून पास मिळवला.

८) सगळे आरोपी इंडिया गेट या ठिकाणी भेटले होते. त्याच ठिकाणी अमोलने सगळ्यांना धुराचे फटाके दिले होते.

९) सागर शर्मा आणि मनोरंजन १३ डिसेंबरच्या दुपारी १२ च्या आसपास संसदेच्या आत गेले.

१०) अमोल आणि नीलम हे दोघं संसदेच्या बाहेर थांबले आणि त्यांनी घोषणा सुरु केल्या. ललित झा हा त्यांचा व्हिडीओ बनवत होता. सिग्नल नावाच्या अॅपने हे सगळे एकमेकांशी जोडले गेले होते. हंगामा झाल्यानंतर ललित सगळ्यांचे मोबाइल घेऊन फरार झाला.

या प्रकरणात विक्की शर्मा आणि त्याची पत्नी वृ्ंदा यांनाही गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. ललित झा नावाचा तरुण फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breach mastermind last seen in rajasthan he fixed date filmed smoke scare scj