वारंवार भारताची खोड काढणाऱ्या चिनी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील लडाख येथे भारतीय हद्दीत १९ किमी इतकी घुसखोरी करून लष्करी छावण्या उभारल्याची माहिती केंद्र सरकारने संरक्षणविषयक संसदीय समितीला शुक्रवारी दिली. या प्रकरणी सीमेवर पूर्वीपासून असलेल्या परिस्थितीत जैसे थे कायम राखण्यावर भर देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
संरक्षण सचिव शशिकांत शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संसदीय स्थायी समितीसमोर माहिती देताना सांगितले की, चीनसोबतच्या सीमेवर भारतीय लष्कर तैनात करण्यात आले आहे, तसेच सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचेही सांगितले.
 भाजप सदस्य मुख्तार अब्बास नकवी आणि प्रकाश जावडेकर यांनी गेल्या आठवडय़ात लडाखमध्ये भारतीय हद्दीतील देपसांग भागात चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्यानंतर तेथील नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबत केंद्र सरकारकडे विचारणा केली होती. त्यानंतर संरक्षण सचिव शर्मा आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी समितीसमोर येऊन माहिती ठेवली. लष्करी अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती असमाधानकारक आणि त्रोटक असल्यामुळे समितीच्या सदस्यांचे समाधान झाले नाही.त्यामुळे  ३० मे रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत चिनी घुसखोरीबद्दल सविस्तर आणि अचूक माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले.
चिनी पंतप्रधानांच्या भारत भेटीवर घुसखोरीचे सावट
बीजिंग : चीनचे नवे पंतप्रधान ली केक्वियांग हे भारतभेटीवर येणार असून त्या भेटीत भारतीय नेत्यांशी होणाऱ्या चर्चेवर लडाखमध्ये चीनच्या लष्कराने केलेल्या घुसखोरीच्या प्रश्नाचे सावट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताशी आपल्याला संबंध सुधारावयाचे आहेत, असा संदेश नव्या पंतप्रधानांना द्यावयाचा असून त्यासाठीच त्यांनी प्रथम दिल्लीत येण्याचे ठरविले असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. चीनच्या पंतप्रधानांनी सर्वप्रथम भारतभेटीवर येण्याची इच्छा व्यक्त केल्याने चीनला दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करावयाचे असल्याचे संकेत मिळत असले तरी या भेटीवर घुसखोरीच्या प्रश्नाचे सावट पडतील.
आणखी नवा साळसूदपणा
बीजिंग/ नवी दिल्ली :लडाखमधील भारतीय हद्दीमध्ये शिरून वर आपल्या लष्कराने घुसखोरी केलीच नसल्याचा कांगावा करणाऱ्या चीनने शुक्रवारी अचानक नरमाईचा पवित्रा घेतला. सध्या निर्माण झालेला प्रश्न मैत्रीपूर्ण मार्गाने सोडविण्याचे शहाणपण व क्षमता उभय देशांमध्ये असून, भारत आणि चीनमध्ये याबाबत सुसंवाद घडविण्यास प्रयत्नशील असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शांततापूर्ण उपाय शोधून काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी स्पष्ट केले.   गुरुवारी आमच्या लष्कराने सीमारेषेचे उल्लंघनच केले नाही, असा पवित्रा घेणाऱ्या चीनने शुक्रवारी मात्र नवा सामोपचारी मार्ग मांडायला घेतला.  सीमा प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये आजपर्यंत सुसंवाद राहिला आहे आणि निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चा व संवादातून संपवता येण्यासारखा असल्याचे चुनयिंग म्हणाल्या. सीमाभागातील शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा