प्रगतशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना ब्रिक्स बँक सर्वसमावेशक विकासासाठी निधी देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले. ब्रिक्स बँक ही आता जागतिक बँकेला स्पर्धक ठरली आहे. ब्रिक्स देशांमध्ये ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो. ब्रिक्स देशांच्या बैठकीत नवीन ब्रिक्स बँकेच्या स्थापनेचा आढावा घेण्यात आला. जी २० परिषदेच्या आधी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांची बैठक यानिमित्ताने झाली. ५० अब्ज डॉलर्सचे प्राथमिक भांडवल घेऊन ही बँक सुरू करण्यात आली आहे, त्याचबरोबर १०० अब्ज डॉलर्सचा तरल निधीही असणार आहे; त्यातून प्रगतशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना निधी दिला जाणार आहे.

काळ्या पैशाच्या संकटाविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्य हवे. परदेशांतील बँकांत काळा पैसा जमा केलेल्या खातेदारांची खाती गोठवून त्यातील पैसा मायदेशी पाठवावा, असे आवाहनही मोदी यांनी रविवारी जी-२० परिषदेत केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कोटा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांची तत्काळ अंमलबजावणी करावी, तसेच नियमाधारित जागतिक व्यापार पद्धत बळकट करण्यासाठी पावले उचलावीत, असे मोदी म्हणाले. भारतासारख्या देशांतील पायाभूत सुविधांसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा वाढवायला हवा. तसेच जागतिक आर्थिक संस्थांची पुनर्रचना करण्याबरोबरच आर्थिक संस्थांमध्ये उत्तम समन्वय ठेवण्यावर जी-२० देशांनी भर द्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले. भारताला २०२२ पर्यंत अक्षय ऊर्जेची क्षमता वाढवण्यासाठी जी-२० परिषदेने भारताला १०० अब्ज डॉलर्सची अर्थपुरवठा करावा, अशी मागणी मोदी यांनी या वेळी केली.