न्यूयॉर्क : जागतिक दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिकांचा निषेध करताना संयुक्त राष्ट्रांनी त्याविरोधात भूमिका घ्यायला हवी, असा आग्रह ‘ब्रिक्स’ देशांच्या संघटनेने धरला आहे. परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात दहशतवादासह अनेक मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

जगाची निम्मी लोकसंख्या असलेल्या ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची ‘ब्रिक्स’ ही संघटना आहे. येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या पाश्र्वभूमीवर ‘ब्रिक्स’च्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली. भारताच्या वतीने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर बैठकीत सहभागी झाले होते.

कोणत्याही स्वरुपात, कोणाकडूनही झालेल्या दहशतवादाचा निषेध केला गेला पाहिजे, असे ‘ब्रिक्स’च्या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले. १९८६ साली भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात सर्वसमावेशक सहकार्या’बाबतचा (सीसीआयटी) प्रस्ताव ठेवला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ब्रिक्स संघटनेने केली आहे.

‘भारताची भूमिका महत्त्वाची’

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासह ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेला अधिक महत्त्वाची भूमिका मिळण्याची गरज असल्याचे ‘ब्रिक्स’ने स्पष्ट केले. जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका वठवणाऱ्या चीन आणि रशिया ब्रिक्समधील अन्य दोन देशांनीही भारताचे महत्त्व बैठकीत मान्य केले.

Story img Loader