Crime News लग्नाच्या आदल्या दिवशीच मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासह तिची आई दागिने घेऊन पळाली आहे. ज्याचं लग्न होणार होतं तो त्याच्या होणाऱ्या सासूच्याच प्रेमात पडला. ज्यानंतर या दोघांनी पळून जायचं ठरवलं. पळून जाण्याआधी या महिलेने म्हणजेच या मुलाच्या होणाऱ्या सासूने पैसे आणि दागिनेही बरोबर घेतले आणि पोबारा केला. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस आता प्रेमी युगुलाचा शोध घेत आहेत.
कुठे घडली ही घटना?
मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह तिची आई पळून गेल्याची ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ या ठिकाणी घडली आहे. विशेष बाब म्हणजे मुलीची आई ते पैसे आणि दागिने घेऊन पळाली आहे जे त्यांनी मुलीच्या लग्नासाठी साठवले होते. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
नेमकी घटना काय घडली?
अलीगढमध्ये राहणाऱ्या महिलेने तिच्या मुलीचं लग्न ठरवलं. त्यानंतर या मुलीचा होणारा नवरा त्यांच्या घरी वारंवार येऊ लागला. तसंच लग्नाची तयारीही त्या घरी होऊ लागली. याच सगळ्या कालावधीत या मुलीचा होणारा नवरा त्याच्या होणाऱ्या सासूच्या प्रेमात पडला. एवढंच काय या मुलाने त्याच्या होणाऱ्या सासूला मोबाइलही भेट म्हणून दिला. या सगळ्या नंतर १६ एप्रिल ही लग्नाची तारीख ठरली होती. मात्र आपल्या आईचे आणि होणाऱ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध जुळले आहेत आणि ते पळून जायच्या बेतात आहेत याची मुलीला पुसटशीही कल्पना नव्हती. एवढंच काय इतरांनाही काहीच माहीत नव्हतं.
लग्नाच्या आदल्या दिवशी काय घडलं?
लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीची आई आणि तिचा होणारा नवरा दोघंही घराच्या बाहेर पडले. तेव्ही मुलीला आणि तिच्या वडिलांना वाटलं की ते दोघंही काहीतरी घ्यायचं राहिलं आहे म्हणून खरेदीला गेले असतील. मात्र ते दोघंही बराच वेळ परतलेच नाहीत. यानंतर मुलीच्या वडिलांना संशय आला. त्यांनी त्यांचं कपाट तपासलं तेव्हा कपाटातून दागिने आणि पैसे लंपास झाल्याचं त्यांना कळलं. मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडली. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांना काय घडलं ते मुलीच्या वडिलांनी सांगितलं आणि तक्रार नोंदवली. आता पोलीस या प्रकरणी या दोघांचाही शोध घेत आहेत.